करोनाच्या आर्थिक दशावतारात जगण्याच्या गतिचक्राला खीळ

समाजातील सर्वच स्तरांत नैराश्य आणि वैफल्यग्रस्ततेत वाढ होत चालली आहे.

उत्पन्नात घट, नैराश्य आणि वैफल्यग्रस्ततेत वाढ; आयुष्य संपविण्याच्या पर्यायाचा स्वीकार

मुंबई : गेल्या दीड वर्षात करोनामुळे आर्थिकदृष्ट्या सर्वच क्षेत्रांत झालेली पीछेहाट, गेलेल्या नोकऱ्या, काम मिळविण्यासाठी करावा लागणारा आटापिटा, मिळणाऱ्या रोजगारात होणारी पिळवणूक या दशावतारात जगण्याचे गतिचक्र बिघडले असून समाजातील सर्वच स्तरांत नैराश्य आणि वैफल्यग्रस्ततेत वाढ होत चालली आहे.

या परिस्थितीतून आयुष्य संपविण्याची दोन ठळक उदाहरणे समोर आली. पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली, तर प्रसिद्ध कलादिग्दर्शक  राजू मारुती साप्ते यांनी शुक्रवारी सायंकाळी पुण्याजवळील वाकड येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

चित्रसृष्टीतील कामगार संघटनेच्या आर्थिक जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी चित्रफितीद्वारे नमूद केले. साप्ते यांची आत्महत्या मनोरंजन क्षेत्रासाठी धक्कादायक ठरली आहे.  मनोरंजन उद्योगाशी निगडित अनेक क्षेत्रांना कोलमडलेल्या आर्थिक परिस्थितीची झळ बसली असून वेगवेगळ्या विभागातील कलाकार – तंत्रज्ञ – कामगारांना मिळणारे काम कमी झाले आहे. कमी काम आणि आहे ते काम कमी खर्चात पूर्ण करण्याचे आव्हान या जोडीला कामगार संघटनांच्या मुजोरीचाही सामना कलादिग्दर्शकांना करावा लागत आहे. कामगार मिळाले नाहीत तर हातचे काम सोडावे लागते आणि त्यांना टिकवण्यासाठी त्यांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे खिसे भरावे लागतात, अशा दुष्टचक्रात कलादिग्दर्शक सापडले आहेत. साप्तेही याच दृष्टचक्राचे बळी ठरले.

कलादिग्दर्शकाचे टोकाचे पाऊल…

पिंपरी : प्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू मारुती साप्ते (वय ५१) यांनी शुक्रवारी सायंकाळी ताथवडे (वाकड) येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी व्हिडिओ चित्रित केला असून चिठ्ठी लिहून ठेवली.  चित्रपटसृष्टीतील कामगार संघटनेच्या सततच्या त्रासाला कंटाळून हे कृत्य करत आहे. मला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी चित्रफितीत म्हटले आहे. हाती असलेल्या पाच प्रकल्पांपैकी काही आर्थिक जाचामुळे सोडून द्यावे लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नोकरी न मिळाल्याने विद्यार्थ्यांची आत्महत्या…

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने हडपसर येथील एका युवकाने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. स्वप्नील सुनील लोणक र (वय २४ ) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. स्वप्नील २०१९ च्या एमपीएससी पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. गेले दीड वर्ष त्याची मुलाखत झाली नव्हती. त्यानंतर त्याने पुन्हा परीक्षा दिली होती. या पूर्व परीक्षेत तो उत्तीर्ण झाला होता. करोनाच्या संसर्गामुळे मुख्य परीक्षा झाली नव्हती. त्यामुळे तो नैराश्यात होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona virus infection corona lockdown economy death corona mpsc exam suicide akp

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या