मुंबई : राज्यात ओमायक्रॉनच्या एकाही नवीन रुग्णाचे निदान बुधवारी झाले नसून आतापर्यंत १० रुग्ण आढळले आहेत. राज्यात करोनाच्या ८९३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर १० जणांचे मृत्यू झाले.

 राज्यात दिवसभरात १०४० रुग्ण करोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ६२८६ इतकी झाली आहे.

राज्यात गेल्या २४ तासांत नाशिक जिल्हा ४५, अहमदनगर जिल्हा ४३, पुणे जिल्हा २३१  नवीन रुग्णांची

नोंद झाली. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत बुधवारी करोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही.

राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर विमानतळावर एक डिसेंबरपासून ४६ हजार ५९० आंतरराष्ट्रीय प्रवासी उतरले. अतिजोखमीच्या देशांमधून आलेल्या ७९३० प्रवाशांची आणि अन्य देशांमधून आलेल्या ८९२५ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून ११ जणांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आले आहेत.

दिवसभरात २५० बाधितांची नोंद

मुंबई : मुंबईत बुधवारी २५० नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर एका करोना रुग्णाचा मृत्यू झाला. मंगळवारपेक्षा बुधवारी करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे मुंबईतील एकूण करोनाबाधितांची संख्या  ७ लाख ६४ हजार ४४४ झाली आहे. 

बुधवारी २६३ रुग्ण करोनामुक्त झाले असून एकूण करोनामुक्त रुग्णांची संख्या  ७ लाख ४३ हजार ८६३ एवढी झाली आहे. मुंबईत सद्यस्थितीला एक हजार ६५२ सक्रीय रुग्ण आहेत, तर मृत रुग्णांची संख्या १६ हजार ३५३ वर पोहोचली आहे. बुधवारी मृत झालेल्या रुग्णाचे वय ६० वर्षांवरील असून त्यांना दीर्घकालीन आजार होता. बुधवारी एकूण ४६ हजार १४१ चाचण्या करण्यात आल्या. मुंबईत प्रतिबंधित इमारतींची संख्या कमी झाली असून १२ इमारती प्रतिबंधित आहेत.

जिल्ह्यात १२१ नवे बाधित

ठाणे : ठाणे जिल्ह्यात बुधवारी १२१ करोना रुग्ण आढळून आले. तर, एकाही रुग्णाची मृत्यूची नोंद नाही.

जिल्ह्यातील १२१ करोना रुग्णांपैकी ठाणे ३७, नवी मुंबई ३६, कल्याण डोंबिवली २२, मीरा-भाईंदर १७, ठाणे ग्रामीण तीन, अंबरनाथ दोन, बदलापूर दोन आणि भिवंडीमध्ये दोन रुग्ण आढळून आले, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.