scorecardresearch

लससक्ती रद्द करण्याची तयारी; राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर २५ फेब्रुवारी रोजी अंतिम निर्णय

लससक्तीचा निर्णय मागे घेत असल्याचे राज्य सरकारतर्फे मंगळवारी उच्च न्यायालयात सांगण्यात आले.

अंतिम निर्णय २५ फेब्रुवारीला

मुंबई : लससक्तीचा निर्णय मागे घेत असल्याचे राज्य सरकारतर्फे मंगळवारी उच्च न्यायालयात सांगण्यात आले. त्याचवेळी करोना निर्बंधांबाबतच्या नव्या आदेशांबाबत २५ फेब्रुवारीला राज्य कार्यकारिणीची बैठक होणार असून लससक्ती कायम ठेवायची की नाही याचा निर्णय घेण्यात येईल, अशी भूमिकाही सरकारने मांडली. त्यामुळे लससक्ती कायम राहणार की नाही हे २५ फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे.

माजी सचिवांचा कायद्यानुसार नसलेला लससक्तीचा निर्णय मागे घेण्याविषयी न्यायालयाने विचारणा केली होती. या प्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी सरकारतर्फे भूमिका मांडण्यात आली. मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी लससक्तीच्या निर्णयाबाबत लिहिलेले पत्र राज्य सरकारच्या वतीने अ‍ॅड्. अनिल अंतुरकर यांनी न्यायालयाला वाचून दाखवले.

 त्यात न्यायालयाने यापूर्वीच्या सुनावणीदरम्यान नोंदवलेले निरीक्षण लक्षात घेऊन २५ फेब्रुवारीला राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आल्याचे आणि त्यात करोनाशी संबंधित निर्बंधांबाबत विशेषत: लससक्तीच्या निर्णयाबाबतच्या सगळय़ा आदेशांचा फेरआढावा घेण्यात येणार असल्याचे नमूद केले. २५ फेब्रुवारीच्या बैठकीत घेण्यात येणारा निर्णय हा न्यायालयाने सुनावणीदरम्यान नोंदवलेल्या निरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येईल, असेही पत्रात म्हटले आहे.

त्यानंतर  १५ जुलै, १० आणि ११ ऑगस्ट २०२१ रोजी लोकल प्रवास, मॉल, सिनेमागृह, हॉटेलमधील प्रवेशासाठी बंधनकारक केलेला लससक्ती निर्णयाचे काय, असा प्रश्न न्यायालयाने केला. त्यावर हे निर्णय मागे घेत असल्याचे अंतुरकर यांनी न्यायालयाला सांगितले. मात्र करोना निर्बंधांच्या नव्या आदेशात लससक्ती मागे घेऊ की आताच्या स्थितीच्या आधारे ती पुन्हा लागू करू हे सध्या सांगू शकत नाही, असेही अंतुरकर यांनी स्पष्ट केले. त्यावर मुंबईत सोमवारी २० महिन्यानंतर दैनंदिन रुग्णसंख्या १००च्या आत आल्याकडे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने राज्य सरकारचे लक्ष वेधले.

तसेच २५ फेब्रुवारीच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत दैनंदिन रुग्णसंख्या झपाटय़ाने कमी होत असल्याचा कल, सध्याच्या परिस्थितीचा आढावा, कृती दलाचे म्हणणे या सगळय़ा बाबी विचारात घेऊन निर्णय घेण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

..नागरिकांच्या अधिकारांचे उल्लंघन

माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा लससक्तीचा आदेश आपत्ती व्यवस्थापन नियमांच्या पूर्णपणे विरोधात होता. त्यामुळे त्यांचा हा निर्णय हा बेकायदा होता आणि त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले. लससक्तीचा आदेश हा राज्य आपत्ती व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन केले आहे आणि राज्य कार्यकारिणीच्या इतर सदस्यांशी कोणताही विचारविनिमय न करता कार्यकारिणीचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या वैयक्तिक क्षमतेत काढल्याचे न्यायालयाने म्हटले. असे आदेश केवळ आणीबाणीच्या स्थितीत काढण्याचा अधिकार कार्यकारिणीच्या अध्यक्षांना आहे. परंतु तिन्ही आदेश काढताना कुंटे यांच्यासमोर आणीबाणीची स्थिती असल्याचे दिसून येत नाही, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona virus infection corona patient local train high court corona vaccination akp

ताज्या बातम्या