उपचाराधीन रुग्णांची संख्या चार हजारांपर्यंत

सप्टेंबरमध्ये गणेशोत्सवानंतर शहरात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव काही अंशी वाढला आणि दैनंदिन नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्याही सुमारे ५०० च्या घरात पोहोचली.

Corona Virus

बाधितांचे प्रमाण १.३३ टक्क्यांवर; दुसऱ्या लाटेचा जोर ओसरला

मुंबई : मुंबईत आता करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरला असून पाच हजारांवर गेलेली उपचाराधीन रुग्णांची संख्या पुन्हा चार हजारांपर्यंत खाली आली आहे. तसेच बाधितांचे प्रमाणही अवघे १.३३ टक्क्यांवर आले आहे.

सप्टेंबरमध्ये गणेशोत्सवानंतर शहरात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव काही अंशी वाढला आणि दैनंदिन नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्याही सुमारे ५०० च्या घरात पोहोचली. उपचाराधीन रुग्णांमध्येही भर वाढत गेल्याने हा आलेख चार हजारांच्याही वर गेला. ऑक्टोबरमध्ये दैनंदिन नव्याने पाचशेहूनही अधिक रुग्णांची भर पडत होती. त्यामुळे शहरातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येने जुलै २०२१ नंतर ऑक्टोबरमध्ये पुन्हा पाच हजारांचा आकडा पार केला होता. परंतु ऑक्टोबरमध्ये शेवटच्या आठवड्यापासून करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोरही कमी व्हायला सुरुवात झाली आहे. परिणामी दैनंदिन रुग्णसंख्येतही घट होऊन सुमारे ४०० पर्यंत खाली आहे, तर उपचाराधीन रुग्णांची संख्याही चार हजारांपर्यंत घटली आहे. मुंबईत बाधितांचे प्रमाणही घटत असून १.३३ टक्क्यांपर्यंत खाली आहे.

तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी

सध्या मुंबईत करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पूर्णपणे कमी झालेला असल्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्येतही घट होत आहे. तसेच मृतांची संख्याही कमी आहे. मृतांमध्ये दीर्घकालीन आजार असलेले आणि ६० वर्षांवरील रुग्णांचा समावेश जास्त आहे. सध्या काही पाश्चात्य देशांमध्ये तिसरी लाट येत आहे. आपल्याकडेही साधारण फेब्रुवारी दरम्यान तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. परंतु या लाटेची तीव्रता खूप कमी असेल, असे मत मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केले.

प्रतिबंधित इमारतींमध्येही घट

मुंबईत प्रतिबंधित इमारतीच्या संख्येतही घट झाली असून सध्या ४३ इमारती प्रतिबंधित आहेत. सध्या सर्वाधिक १४ प्रतिबंधित इमारती अंधेरी पश्चिम भागांत असून त्या खालोखाल ग्रॅण्टरोड (६), गोवंडी (५), भायखळा (३) आणि नरिमन पॉइंट (३) या परिसरातील इमारतींचा त्यात समावेश आहे. याशिवाय चेंबूर, दादर, परळ भागात प्रत्येकी दोन तर मालाड, वांद्रे (पश्चिम), प्रभादेवी आणि माटुंगा परिसरात प्रत्येकी एक इमारत प्रतिबंधित आहे. सध्या मुंबईत चार हजार १४४ रुग्ण उपचार घेत असून सर्वाधिक रुग्ण अंधेरी पश्चिम आणि पूर्व, बोरिवली (पश्चिम), कांदिवली (पश्चिम) आणि मालाड (पश्चिम) या भागांमध्ये आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona virus infection corona positive patient akp 94