मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात करोनाचा शिरकाव मुंबईत झाल्यापासून महापालिका व इतर यंत्रणांचा करोनाविरोधात लढा सुरू आहे. या लढ्याला यश आल्यामुळे करोनाची पहिली व दुसरी लाट आपण थोपवली. या लढ्याच्या दृष्टीने दिलासादायक बाब म्हणजे शनिवारी मुंबईत करोनामुळे एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

 २६ मार्च २०२० ला पहिला रुग्ण सापडल्यापासून करोनामुळे दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू न झाल्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी १७ ऑक्टोबर २०२१ ला करोनामुळे एकही रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. मुंबई महापालिकेने राबवलेल्या विविध उपाययोजना व मुंबईकरांची साथ यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे.

 मुंबईत शनिवारी दिवसभरात करोनाचे २५६ नवीन रुग्ण सापडले आहेत. गेल्या चार महिन्यांपासून शहरातील करोना रुग्णांचा आकडा स्थिर असून दिवसाला २०० ते ३५० च्या दरम्यान करोनाचे रुग्ण सापडत आहेत. मुंबईतील करोनाबाधित रुग्णांची संख्या ७ लाख ६५ हजार ११० वर पोहोचली आहे. याशिवाय दिवसभरात २२१ रुग्णांनी करोनावर मात केल्याने आतापर्यंत ७ लाख ४४ हजार ३७० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईत सध्या एक हजार ८०८  रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

ठाणे जिल्ह्यात ८६ करोनाबाधित

ठाणे जिल्ह्यात शनिवारी ८६ करोना रुग्ण आढळून आले. तर, एकाही रुग्णाची मृत्यूची नोंद नाही.