मुख्यमंत्र्यांचा आदेश; सात जिल्ह्यांमध्ये अधिक खबरदारी

 

मुंबई  :  करोनाचे संकट अजूनही कायम आहे. यामुळेच घाईघाईत व्यवहार खुले करू नका व गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासकीय अधिकाऱ्यांना गुरुवारी दिला. करोनाचा संसर्गदर जास्त असलेल्या सात जिल्ह्यांमध्ये अधिक खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे.

करोना परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच संसर्गदर अधिक असलेल्या रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली या सात जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. आरोग्यमंत्री राजेश टोपे व त कृतिदलाचे तज्ज्ञ या वेळी उपस्थित होते.

निर्बंध काहीसे शिथिल के ल्यावर गर्दी वाढली आहे. करोनाचे संकट अजूनही कायम आहे. अशा वेळी नागरिक मुक्तपणे बाहेर फिरू लागल्यास करोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. करोनाच्या उत्पपरिवर्तीत विषाणूचा धोका वाढला आहे. यामुळेच निर्बंध मुक्त करण्याची घाई करू नका, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली या सात जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णसंख्या आणि संसर्गदर अधिक असल्याने अधिक खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. या सातही जिल्ह्यांमध्ये चाचण्यांची संख्या वाढविण्याची सूचना कृतीदलाचे सदस्य डॉ. संजय ओक आणि डॉ. शशांक जोशी यांनी के ली. राज्याचा संसर्गदर ०.१५ टक्यांनी कमी झाला असला तरी या सातही जिल्ह्यांमधील संसर्गदर अधिक असल्याकडे अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) डॉ. प्रदीप व्यास यांनी लक्ष वेधले.