४५ टक्के मृत्यू ६० ते ८० वयोगटातील; ज्येष्ठ नागरिकांना धोका कायम

Adani Group, gautam adani, investment, Ambuja Cement
अदानी समूहाची अंबुजा सिमेंटमध्ये ८,३३९ कोटींची गुंतवणूक
नाव उलटून सहा मृत्युमुखी; झेलम नदीतील दुर्घटना, बहुसंख्य शाळकरी मुलांचा समावेश
heat stroke patients maharashtra,
राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ७७ वर, मागील चार दिवसांमध्ये ३६ रुग्ण वाढले
gudi padwa in Nagpur
नागपुरात गुढीपाडव्याला सुमारे १५० बालकांचा जन्म, मुलींचा टक्का अधिक

 मुंबई : राज्यात मागील तीन आठवड्यांमध्ये ३१४ मृत्यू झाले असून यातील सुमारे ४५ टक्के मृत्यू हे ६० ते ८० या वयोगटातील रुग्णांचे झाले आहेत. राज्यभरात पसरणारी तिसरी लाट ही ओमायक्रॉनची असून तिचे स्वरूप सौम्य असले तरी डेल्टाचाही प्रादुर्भाव आहे, त्यामुळे यापुढे ही मृत्युदर कमी राहण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांवर अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

राज्यात ६ ते २६ डिसेंबर या तीन आठवड्यांच्या काळात १५७ रुग्णांचा मृत्यू झाला. यातही सुमारे ५४ टक्के मृत्यू हे ६० ते ८० वयोगटातील रुग्णांचा झाला आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून मुंबईसह ठाणे, पुणे येथे रुग्णसंख्या वेगाने वाढली. परिणामी मृत्यूचे प्रमाणही या काळात जवळपास दुपटीने वाढले. २७ डिसेंबर ते १६ जानेवारी या तीन आठवड्यांच्या काळात राज्यभरात ३१४ रुग्णांचा मृत्यू झाला. यात सर्वाधिक १७२ रुग्ण हे ६० ते ८० वयोगटातील होते. तर त्या खालोखाल ५० ते ६० वयोगटातील ५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 मुंबईसह ठाणे, पुणे येथे आलेली तिसरी लाट ओमायक्रॉनमुळे सौम्य स्वरूपाची आहे. परंतु यामध्ये डेल्टाचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे तिसऱ्या लाटेतही ज्येष्ठ नागरिकांना, दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांना धोका आहे. सध्या ही लाट ग्रामीण भागाकडे पसरत आहे. त्यामुळे मृत्युदर कमी ठेवण्यासाठी ६० वर्षावरील रुग्णांवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केले.

रुग्णालयात दाखल होणाऱ्या काही रुग्णांमध्ये डेल्टाची लक्षणे आढळून आली आहेत. काही रुग्णांच्या फुप्फुसांवर परिणाम होत असून त्यांना प्राणवायू लावावा लागत आहे. याचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी रोगप्रतिकारशक्ती क्षीण असलेल्या, दीर्घकालीन आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी करोनाची लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ल्याने चाचण्या करून घेणे, उपचार सुरू करणे गरजेचे आहे.

तसेच आता ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली प्रतिबंधात्मक मात्रा घेणेही महत्त्वाचे आहे. यामुळे करोनाची बाधा होण्यापासून संरक्षण मिळणार नसले तरी आजाराची तीव्रता कमी करण्यास निश्चित मदत होईल, असे कृती दलाने अधोरेखित केले आहे.

राज्यात अजूनही सुमारे ६८ टक्के डेल्टाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे ओमायक्रॉनमुळे आलेल्या तिसऱ्या लाटेमध्येही सतर्कता बाळगणे गरजेचे आहे, असे मत वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

 दुसऱ्या लाटेच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण कमी

 तिसऱ्या लाटेमध्ये दुसऱ्या लाटेच्या तुलनेत रुग्णसंख्या अधिक असली तरी मृत्यूचे प्रमाण त्या तुलनेत कमी आहे. दुसऱ्या लाटेमध्ये ११ एप्रिल ते १ मे या तीन आठवड्यांच्या काळात २५ हजार ७८७ मृत्यू झाले होते. त्या तुलनेत मागील तीन आठवड्यांत ३१४ रुग्णांचे मृत्यू झाले. तिसऱ्या लाटेचा पहिला टप्पा अजून मुंबई, ठाणे आणि पुण्यापुरता मर्यादित होता, परंतु आता त्याचा प्रसार अन्य जिल्ह्यांमध्येही होऊ लागला आहे.