करोना मृत्यूदर कमी झाल्याचे चित्र फसवे

करोना मृत्यूंची विलंबाने एकदम नोंद करण्याची आरोग्य विभागाची ही दुसरी वेळ आहे.

corona-10-1-1-2

|| शैलजा तिवले
३,५०९ मृत्यूंची विलंबाने नोंद
मुंबई : राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेत जरी रुग्णसंख्या वाढलेली असली तरी मृत्यूदर जवळपास निम्म्यापेक्षाही कमी झाल्याचे चित्र मे महिन्यात निर्माण झाले होते. मात्र ते फसवे असून मृत्यूची नोंदच उशीरा झाल्याचे समोर आले आहे. अशा नोंद न झालेल्या ३,५०९ मृत्यूंची २० जुलै रोजी एकदम एकूण आकडेवारीत नोंद करण्यात आली. यातील जवळपास ९० टक्के मृत्यू हे मार्च ते जून या काळातील आहेत. अशा प्रकारे करोना मृत्यूंची विलंबाने एकदम नोंद करण्याची आरोग्य विभागाची ही दुसरी वेळ आहे.

उशीरा नोंदणी केलेल्या मृत्यूंमधील सर्वाधिक- म्हणजे प्रत्येकी जवळपास ४०० हून अधिक मृत्यू हे नागपूर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यांमधील आहेत. त्या खालोखाल अहमदनगर, सांगली, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांचा नोंदणीविलंबात समावेश आहे. मृत्यूंची उशीराने नोंदणी करणाऱ्यांमध्ये महानगरपालिका आणि ग्रामीण अशा दोन्ही विभागांचा समावेश आहे. परंतु महानगरपालिकांमध्ये विलंबाचे प्रमाण अधिक आहे. पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड येथून अनुक्रमे २३२ आणि २६२ मृत्यूंची नोंद उशीरा केली आहे, तर पुणे ग्रामीणमधून १३६ मृत्यू उशीरा कळवले आहेत. नाशिक महानगरपालिकेत ४१६, तर नाशिकच्या ग्रामीण भागात १५२ मृत्यूंची नोंद वेळेत केलेली नाही. नागपूरमध्ये चित्र काहीसे उलट असून नागपूर ग्रामीणमधून ४७५, तर महानगरपालिकेमधून १४६ मृत्यू उशीरा नोंदले आहेत. अहमदनगर ग्रामीण आणि मनपा भागात अनुक्रमे २४४ आणि २२६ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद  उशीरा केली आहे. सांगलीच्या ग्रामीण भागातूनही १५९ मृत्यूंची नोंद उशीरा केली आहे. मुंबई महानगर प्रदेशात मुंबई आणि ठाणे भागातून प्रत्येकी ७१ मृत्यू उशीरा कळवले आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतून १३८, तर वसई-विरार महानगरपालिकेतून १०५ मृत्यू वेळेत नोंदलेले नाहीत.

मार्च २०२० ते जानेवारी २०२१ या काळात- म्हणजेच करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये राज्यात सुमारे २० लाख २६ हजार रुग्ण होते आणि ५१,०८० मृत्यू झाले होते. पहिल्या लाटेमध्ये मृत्यूदर सुमारे २.५२ टक्के होता. फेब्रुवारी ते मे २०२१ या काळात पूर्वीच्या आकडेवारीनुसार मृत्यूदर हा सुमारे १.८ टक्के होता. परंतु दुसरी लाट ही बराच काळ लांबली असून जुलै महिना संपत आला तरी लाट पूर्णपणे ओसरल्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यात एकदम मार्च ते जून २०२१ मधील ३,५०९ मृत्यूंची आणि २,४७९ रुग्णांची नोंदही नुकतीच झाली आहे. त्यामुळे फेब्रुवारी ते जुलै (२०२१) या दुसऱ्या लाटेच्या कालावधीत करोनाबाधितांची संख्या सुमारे ४२ लाखांवर गेली आहे. ती पहिल्या लाटेच्या तुलनेत दुपटीहूनही अधिक आहे. तर मृतांची संख्या ७९,६७३ झाली आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेचा मृत्यूदर जवळपास दोन टक्क्यांच्याही वर गेला आहे.

‘‘आता केलेल्या ३,५०९ मृत्यूंच्या नोंदीपैकी सुमारे ९० टक्के  मृत्यू हे मार्च ते जून २०२१ या काळातील आहेत. राज्यात याआधी पहिल्या लाटेमध्ये १,३९२ मृत्यूंची नोंदणी उशीरा झाल्याने ती एकदम केली होती.’’ अशी माहिती राज्याच्या साथरोग सर्वेक्षण विभागाचे प्रमुख डॉ.प्रदीप आवटे यांनी दिली.

आरोग्य विभाग आणि मृत्यू विश्लेषण समितीने सूचना देऊनही नोंदणी उशीराने होण्याचा प्रकार सुरू आहे. बहुतांश वेळा खासगी रुग्णालयातून माहिती वेळेत मिळत नाही, मृत्यू करोनाने झाला आहे का हे ठरवण्यासाठी रुग्णालय किंवा विभाग स्तरावरील बैठका वेळेत होत नाहीत,  अशी कारणे आरोग्य विभाग देतो.

खासगी रुग्णालयांनी वेळेवर नोंद केली नसल्यामुळे आणि त्यांनी वेळेत पोर्टलवर माहिती न दिल्यामुळे मृत्यूंची नोंदणी वेळेत झालेली नाही. आरोग्य विभागाला याबाबत वारंवार सूचना दिल्या आहेत. खासगी रुग्णालयांच्या मागे लागून या आकडेवारीची वेळेत नोंद करण्याचे आदेशही दिले आहेत. अशा रितीने एकदम नोंदणी करण्याची वेळ येऊ नये, यासाठी कडक नियमावलीही बनवण्याचे आदेश दिले जातील. – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

राज्याला आम्ही वारंवार वेळेत मृत्यूंची नोंद करण्यास सूचित केले आहे. मेमध्ये दिलेल्या मृत्यू विश्लेषण अहवालातही ४८ तासांत मृत्यूंची नोंद करण्याचे आदेश देण्याबाबत सांगितले आहे. तरीही यंत्रणांकडून वेळेत नोंदणी होत नसल्याचे सांगितले जाते. पहिल्या लाटेच्या तुलनेत निश्चितच दुसऱ्या लाटेमध्ये मृतांची संख्या अधिक आहे. – डॉ. अविनाश सुपे,

मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख

मृत्यूंची नोंदणी होण्यास का उशीर होतो याच्या खोलात जाणे गरजेचे आहे. मुळातच आपल्याकडे जन्म आणि मृत्यूदर यांची नोंदणी, मृत्यूच्या कारणांची नोंद करणारी यंत्रणा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत कमकुवत आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य कायदा आणणे गरजेचे असून त्याअंतर्गत आवश्यक मनुष्यबळ, तंत्रज्ञान आणि मुबलक आर्थिक निधी उपलब्ध होईल यावर भर देणे आवश्यक आहे. -डॉ. सुभाष साळुंखे, राज्य करोना कृतिदलाचे सल्लागार

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Corona virus infection corona positive patient corona death patient health minister state government akp