मुंबई : राज्यात दिवसभरात ८,२९६ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली तर १७९ जणांचा मृत्यू झाला. त्याच वेळी सहा हजार रुग्ण करोनामुक्त झाले.

राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या  एक लाख १४ हजार आहे. गेल्या २४ तासांत कोल्हापूर जिल्हा १४९३, सांगली १०३३, रायगड ४०९, सातारा ८३९, पुणे ग्रामीण ५५७ रुग्ण नव्याने आढळले.

मुंबईत ५०४ नवे बाधित

मुंबई : मुंबईत शनिवारी ५०४ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर १३  रुग्णांचा मृत्यू झाला. ७३६ रुग्ण करोनामुक्त झाले.  उपचाराधीन रुग्णांची संख्या साडेसात हजारांच्या खाली गेली आहे.

ठाणे जिल्ह्यात ४२९  रुग्ण

ठाणे : ठाणे जिल्ह्यात शनिवारी ४२९ करोना रुग्ण आढळून आले. तर आठ जणांचा मृत्यू झाला.

लसीकरणापूर्वी दोन चाचण्यांचा आदेश रद्द

पनवेल : लसीकरण केंद्रच करोनाचे सामाजिक संसर्ग केंद्र बनत असल्याने लसीकरणापूर्वी प्रतिजन व आरटीपीसीआर या दोनही करोना चाचण्या अनिवार्य करण्याचे आदेश रायगड जिल्हा प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी लागू केले; परंतु या आदेशाचा गोंधळ उडाल्याने काही तासांत राज्याच्या आरोग्य विभागाने सुधारित आदेश काढून रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश रद्द केला आहे.