मुंबई : राज्यात दिवसभरात करोनाच्या २,६८१ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ४९ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात २४१३ रुग्ण करोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची  संख्या ३३ हजार ३९७ इतकी आहे.

गेल्या २४ तासांत वसई-विरार ८५, रायगड ९३, पनवेल ५९, नाशिक ४६, नाशिक शहर ४०, अहमदनगर ३७६, पुणे ३४३, पुणे शहर १३८, पिंपरी-चिंचवड ७३, सोलापूर १२९, सातारा १८७, सांगली ४०, सिंधुदुर्ग ५७, रत्नागिरी ४३, उस्मानाबाद इथे ४० नव्या रुग्णांची नोंद झाली.

मुंबईत आणखी ४५८ रुग्ण

मुंबईत गुरुवारी ४५८ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला. उपचाराधीन रुग्णाची संख्या मात्र किंचित वाढली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या ४,७८४  झाली आहे.

करोना रुग्णांची संख्या गेला महिनाभर स्थिर होती. मात्र बुधवारी अचानक सहाशेपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली. मात्र गुरुवारी पुन्हा एकदा पाचशेपेक्षा कमी रुग्ण आढळले. रुग्णदुपटीचा कालावधी १,११८ दिवस झाला आहे. तर रुग्णवाढीचा दर ०.०६ टक्के आहे. एकूण बाधितांची संख्या ७ लाख ४६ हजारांपुढे गेली आहे. तर एका दिवसात १८५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ७ लाख २२ हजारांहून अधिक म्हणजेच ९७ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

ठाणे जिल्ह्यात एकाही मृताची नोंद नाही

ठाणे : ठाणे जिल्ह्यात गुरुवारी २६७ करोना रुग्ण आढळून आले. तर गुरुवारी एकाही मृताची नोंद नव्हती. ठाण्यात ८४, नवी मुंबई ६९, कल्याण-डोंबिवली ६४, मीरा भाईंदर २७, उल्हासनगर आठ, बदलापूर सात, अंबरनाथ चार, ठाणे ग्रामीण तीन, भिवंडीतील एक रुग्ण आढळून आला.

देशात उपचाराधीन रुग्णांत मोठी घट

देशातील उपचाराधीन रुग्णांत मोठी घट झाली आहे. २०४ दिवसांतील म्हणजेच जवळपास सात महिन्यांतील सर्वात कमी उपचाराधीन २ लाख ४४ हजार १९८ रुग्णसंख्या बुधवारी नोंदली गेली. उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या ०.७२ टक्के इतकी असून मार्च २०२० नंतर प्रथमच इतकी कमी नोंदली गेली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केले आहे.   गेल्या २४ तासांत २२,४३१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३१८ जणांचा मृत्यू झाला आहे.