मुंबई: राज्यात सुमारे ७५ लाख नागरिक दुसऱ्या मात्रेची नियोजित वेळ उलटून गेली तरी अजून लसीकरणासाठी आलेले नाहीत. राज्यात पहिल्या मात्रेचे लसीकरण ७२ टक्क्यांवर गेले असले तरी दुसऱ्या मात्रेचे प्रमाण मात्र ३२ टक्के आहे, तर १८ जिल्ह्यांमध्ये दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्यांचे प्रमाण २५ टक्क्याहूनही कमी आहे. त्यामुळे आता राज्यात करोनाचा जोर ओसरल्यावर दुसऱ्या मात्रेचे लसीकरण करणे आरोग्य विभागासाठी आव्हानात्मक झाले आहे.

राज्यात आत्तापर्यत ९ कोटी ७२ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यात पहिल्या मात्रेचे सर्वाधिक ९८ टक्के लसीकरण मुंबईत तर त्या खालोखाल पुणे (९३ टक्के), भंडारा (९१ टक्के) आणि सिंधुदुर्गमध्ये (८८ टक्के) झाले आहे. दोन्ही मात्रा पूर्ण झालेल्यांमध्ये मुंबई प्रथम क्रमांकावर असून ५८ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यानंतर पुण्यात ५० टक्के, भंडाऱ्यात ४५ टक्के आणि सिंधुदुर्गमध्ये ४७ टक्के नागरिकांच्या दोन्ही मात्रा पूर्ण झाल्या आहेत. राज्यात सध्या कोविशिल्डच्या लशीचे सुमारे ६० लाख तर कोव्हॅक्सिन लशीचे सुमारे १५ लाख अशा एकूण ७५ लाख नागरिकांनी दुसऱ्या मात्रेची नियोजित वेळ होऊन गेली तरीही लस घेतलेली नाही. सध्या राज्यात सुमारे ५६ लाखांहून अधिक लशींचा साठा शिल्लक आहे. परंतु नागरिक दुसरी मात्रा घेण्यासाठी येत नसल्यामुळे त्यांचे लसीकरण कसे पूर्ण करावे, असा प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.

राज्यात दुसऱ्या लाटेची पहिल्यांदा सुरुवात झालेल्या अमरावती जिल्ह्यात पहिल्या मात्रेचे लसीकरण ५४ टक्के झाले आहे, परंतु दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्यांचे प्रमाण सुमारे २४ टक्के आहे. ‘करोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे, तसे लसीकरणासाठी येणाऱ्यांची गर्दीही कमी झाली आहे. महिन्याभरापूर्वी आमच्याकडे दिवसाला २० हजार नागरिकांचे लसीकरण केले जात होते, परंतु आता हे प्रमाण सात ते आठ हजारांवर आले आहे. दुसऱ्या मात्रेचे लसीकरण प्राधान्याने करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत, परंतु नागरिकच लसीकरणासाठी येत नाहीत,’ असे अमरावतीच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यात लसीकरणाचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून कमी झाले असून दरदिवशीच्या लसीकरणाचे प्रमाण आता सुमारे पाच लाखांपर्यत घटले आहे. सप्टेंबरमध्ये सरासरी प्रतिदिन आठ ते नऊ लाख लसीकरण केले जात होते.

राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये पहिल्या मात्रेचे लसीकरण ५० टक्क्यांहून अधिक झाले असले तरी दोन्ही मात्रा पूर्ण झालेल्या नागरिकांचे प्रमाण त्या तुलनेत कमी आहे. राज्यात पाच जिल्ह्यांमध्येच दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्यांचे प्रमाण ४० टक्क्याहून अधिक आहे, तर १८ जिल्ह्यांमध्ये २० टक्क्यांहून कमी नागरिकांनी दोन्ही मात्रा घेतलेल्या आहेत.

जनजागृती महत्त्वाची

राज्यात अजूनही काही जिल्ह्यांमध्ये लशीबाबत अपसमज असून ते दूर करण्यासाठी लससाक्षरता करणे आवश्यक आहे. आजाराची तीव्रता अधिक असली की भीतीने नागरिक लसीकरणासाठी येतात, परंतु तीव्रता कमी झाल्यानंतर लसीकरणाचे प्रमाण कमी होते. करोनाची भीती कमी होईल तसे लसीकरणाचा भरही कमी होण्याची शक्यता आहे. तेव्हा हा जोर कायम ठेवण्यासाठी सातत्याने लसीकरणाबाबत जागृती करणे आवश्यक आहे, असे मत करोना कृतीदलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले.

पाठपुरावा गरजेचा

राज्यात सुमारे ७५ लाख नागरिक दुसऱ्या मात्रेच्या लसीकरणाची वेळ उलटून गेली तरी लसीकरणासाठी आलेले नाहीत. अशा नागरिकांची यादी काढून पाठपुरावा करण्याच्या सूचना प्रत्येक लसीकरण केंद्राला दिलेल्या आहेत. देशभरात सध्या सर्वाधिक दुसऱ्या मात्रेचे लसीकरण राज्यात झाले आहे. तरीही लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे आरोग्य आयुक्तालयाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले.

प्रमाण २० टक्क्यांहून कमी

राज्यात हिंगोली आणि सोलापूरमध्ये दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्यांचे प्रमाण सर्वात कमी १९ टक्के आहे. याव्यतिरिक्त पालघर, अहमदनगर, नाशिक, जालना, जळगाव, उस्मानाबाद, परभणी, लातूर, अमरावती, औरंगाबाद. नांदेड, यवतमाळ, बुलढाणा, बीड, अकोला आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये २० टक्क्याहून कमी नागरिकांच्या दोन्ही मात्रा पूर्ण झालेल्या आहेत.