लसीकरणाकडे गर्भवतींची पाठ; लशीच्या सुरक्षिततेबाबतचा संभ्रम अजूनही कायम

जानेवारीपासून लसीकरण सुरू केले त्यावेळी गर्भवती आणि स्तनदा मातांना यातून वगळण्यात आले. परंतु जसजसे संशोधनात्मक अभ्यासातून गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी ही लस सुरक्षित असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर १५ जुलैपासून केंद्रीय आरोग्य विभागाने या महिलांच्या लसीकरणालाही परवानगी दिलेली आहे. परंतु आता जवळपास साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी मुंबईत गर्भवती आणि स्तनदा मातांचा लसीकरणासाठी प्रतिसाद अजूनही फारसा वाढलेला नाही.

||शैलजा तिवले

लशीच्या सुरक्षिततेबाबतचा संभ्रम अजूनही कायम; केवळ २,६२५ गर्भवती महिलांचे लसीकरण

मुंबई : मुंबईमध्ये करोनाप्रतिबंधात्मक लशीच्या पहिल्या मात्रेचे लसीकरण ९७ टक्क्यांपर्यंत झाले असले तरी गर्भवती आणि स्तनदा मातांच्या लसीकरणाला मात्र तुलनेने फारच कमी प्रतिसाद मिळत आहे. मुंबईत आतापर्यंत केवळ २ हजार ६२५ गर्भवतींचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे मुंबईतील गर्भवती मातांमध्ये करोनाबाधित होण्याचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

जानेवारीपासून लसीकरण सुरू केले त्यावेळी गर्भवती आणि स्तनदा मातांना यातून वगळण्यात आले. परंतु जसजसे संशोधनात्मक अभ्यासातून गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी ही लस सुरक्षित असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर १५ जुलैपासून केंद्रीय आरोग्य विभागाने या महिलांच्या लसीकरणालाही परवानगी दिलेली आहे. परंतु आता जवळपास साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी मुंबईत गर्भवती आणि स्तनदा मातांचा लसीकरणासाठी प्रतिसाद अजूनही फारसा वाढलेला नाही.

पाश्चात्त्य देशांमध्ये गर्भवती महिलांचे लसीकरण आधीच सुरू झाले होते. लस दिलेल्या गर्भवती महिलांच्या प्रसूतीही सुरक्षितपणे होऊन बाळही सुरक्षित असल्याचे विविध संशोधनात्मक अभ्यासातून मांडले जात आहे. परंतु आपल्याकडे अजूनही या महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये लशीबाबतचा संभ्रम कायम आहे. त्यामुळे अद्याप या महिला लसीकरणासाठी फारशा पुढे येत नाहीत, असे एच.एन. रिलायन्स रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रेखा डावर यांनी सांगितले.

करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या अशा दोन्ही लाटेमध्ये गर्भवती महिला या जोखमीच्या गटात असून यांना करोनाची बाधा झाल्यास धोका अधिक असल्याचे आढळले आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार दरवर्षी सुमारे दीड लाख महिलांची प्रसूती शहरात होते, परंतु यातील सुमारे दोन टक्क्यांहूनही कमी गर्भवती महिलांचे लसीकरण झालेले आहे. येत्या काळात बहुतांश जणांमध्ये लशीमुळे प्रतिकारशक्ती निर्माण झालेली असेल. त्या तुलनेत गर्भवती महिलांचे लसीकरण न झाल्यामुळे यांना करोनाची बाधा होण्याचा धोका अधिक आहे.

समुपदेशनाची आवश्यकता- तज्ज्ञांचे मत

दुसऱ्या लाटेमध्ये ज्या गर्भवती महिला बाधित झालेल्या होत्या, त्यांच्या पोटातील अर्भकालाही करोनाची बाधा झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे केवळ मातेलाच धोका आहे असे नाही, तर अर्भकालाही तितकाच धोका असल्यामुळे गर्भवती महिलांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. आम्ही अनेकदा गर्भवतींचे समुपदेशन करतो. त्यानंतर बऱ्याच जणींच्या मनातील शंका दूर होतात आणि त्या लस घेण्यास तयार होतात. त्यामुळे समुपदेशनाची गरज असल्याचे डॉ. डावर यांनी सांगितले.

८५३ गर्भवतींनाच दोन्ही मात्रा

पालिकेच्या आकडेवारीनुसार, २५ ऑक्टोबरपर्यंत मुंबईत २६२५ गर्भवती महिलांचे लसीकरण झाले असून यातील १७७२ महिलांनी पहिली मात्रा घेतली आहे, तर दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्यांची संख्या केवळ ८५३ आहे.

सरकारी रुग्णालयात आतापर्यंत २१५ गर्भवतींचे लसीकरण झाले असून यातील केवळ १०० महिलांच्या दोन्ही मात्रा पूर्ण झालेल्या आहेत.

पालिकेच्या लसीकरण केंद्रावर ११६३ गर्भवती महिलांचे लसीकरण झाले असून यातील ८५१ जणींची पहिली, तर ३१२ महिलांच्या दोन्ही मात्रा पूर्ण झालेल्या आहेत.

खासगी रुग्णालयांमध्ये १२४७ गर्भवतींचे लसीकरण झाले आहे. यात ८०६ महिलांनी लशीची पहिली, तर ४४१ महिलांनी दुसरी मात्रा पूर्ण केलेली आहे.

मुंबईत सोमवारपर्यंत १२ हजार ६०८ स्तनदा मातांचे लसीकरण झाले असून यातील २५६२ महिलांच्या दोन्ही मात्रा पूर्ण झालेल्या आहेत.

पालिकेच्या केंद्रावर गर्भवतींच्या लसीकरणासाठी सुविधा दिलेल्या आहेत, परंतु लस घेणे हा ऐच्छिक निर्णय आहे. लसीकरणाचे फायदेही केंद्रावर महिलांना दिले जातात, परंतु त्यांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही.  – डॉ. संतोष रेवणकर, उपकार्यकारी आरोग्य अधिकारी

सरकारी रुग्णालयांमध्ये महिला आणि बालकांसाठी असलेल्या कामा रुग्णालयातही गर्भवती महिलांनी लसीकरणाकडे पाठ वळविली आहे.  गर्भवती महिलांना लस घेण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला जातो, परंतु तरीही अनेक महिला लस घेण्यासच तयार नाहीत. – डॉ. तुषार पालवे, वैद्यकीय अधीक्षक, कामा रुग्णालय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona virus infection corona positive patient corona vaccine pregnant women ignore akp

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी