दुकाने, उपाहारगृहांच्या वेळमर्यादेत वाढ; एक-दोन दिवसांत मार्गदर्शक सूचना  

मुंबई : करोना रुग्णआलेख घसरल्याने दिवाळीच्या तोंडावर दुकाने, उपाहारगृहे, मॉलची वेळमर्यादा वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला. करमणूक उद्यानेही (अम्युझमेंट पार्क ) सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना एक- दोन दिवसांत जारी करण्यात येणार असून, त्यानंतर त्यांची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल.

सणासुदीच्या काळात दुकाने आणि उपाहारगृहांची वेळमर्यादा वाढवून देण्याची मागणी दुकानदार, व्यापारी आणि उपाहारगृह मालकांच्या संघटनांकडून करण्यात येत होती. रुग्णसंख्या घटल्याने निर्बंध शिथिल करावेत आणि दुकानांच्या वेळा वाढवून देण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे के ली होती. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाविषयक कृतिगटाच्या तज्ज्ञांशी सोमवारी सविस्तर चर्चा केली. त्यानंतरच दुकाने, उपाहारगृहांची वेळमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

सध्या दुकाने आणि उपाहारगृहे रात्री १० पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी आहे. वेळा वाढविण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानुसार एक-दोन दिवसांत मार्गदर्शक सूचना जाहीर के ली जाण्याचे संकेत आहेत. या सूचनांची अंमलबजावणीही तातडीने होईल. बैठकीला मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर, कृतिगटाचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. खुसराव्ह, डॉ. अजित देसाई, डॉ. सुहास प्रभू आदी उपस्थित होते.

करोनाचा संसर्ग कमी झाल्याने शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे तसेच नाट्यगृहे खुली करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. बुधवारपासून महाविद्यालये, तर शुक्रवारपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू होणार आहेत. त्याच दिवसापासून करमणूक उद्याने खुली करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता शॉपिंग मॉल, सर्र्व व्यापारी दुकानांची वेळ वाढवून देताना रात्री १२ नंतर कोणतेही दुकान सुरू राहणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आली आहे. वेळमर्यादा ठरविण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले असले तरी मुंबई, ठाणे, पुणे या मोठ्या शहरांमध्ये रात्री १२ पर्यंत व्यवहार खुले ठेवण्यास मुभा दिली जाईल. याबाबत बुधवारी मार्गदर्शक सूचना जाहीर के ली जाण्याची शक्यता आहे.

एक लसमात्रा घेतलेल्यांना सवलत नाही

लशीची एक मात्रा घेतलेल्यांना रेल्वे किं वा मॉलमध्ये प्रवेश देण्याबाबत तसेच उपाहारगृह, चित्रपटगृहातील ५० टक्के  क्षमता वाढविण्याबाबत या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही. सध्या हे बंधन कायम राहील. मात्र, या महिनाअखेर पुन्हा बैठक होणार असून, त्या वेळी उर्वरित निर्बंध  शिथिल के ले जातील, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

मुलांच्या लसीकरणाचे नियोजन…

मुलांच्या लसीकरणासंदर्भात केंद्राच्या संपर्कात राहून लस उपलब्ध करून घेण्याबरोबरच याबाबत नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाला दिल्या.

करोनाव्यतिरिक्त

डेंग्यू, चिकूनगुनियाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून त्यांच्या उपचारांकडेही पुरेसे लक्ष द्यावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या  वेळी दिले.

करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी बेसावध राहू नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला केली.

राज्यात मोठी रुग्णघट

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत मोठी रुग्णघट झाली. दिवसभरात राज्यात करोनाचे १४८५ नवे रुग्ण आढळले, तर २७ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात २०७८ रुग्ण करोनामुक्त झाले असून, उपचाराधीन रुग्णांची संख्या २८ हजार आहे. गेल्या २४ तासांत मुंबई ३७३, अहमदनगर १४३, पुणे जिल्हा १५०, पुणे शहर ७९, सोलापूर ४९, सातारा ४७, सांगली ७४ नवे रुग्ण आढळले.