मुंबई : मुंबईतील करोना रुग्णांची दैनंदिन संख्या वाढत असून शनिवारी ४८५ नव्या रुग्णांची नोंद झाली तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला. उपचाराधीन रुग्णाची संख्याही वाढून साडेचार हजाराच्यापुढे गेली आहे. आता महिन्याभरानंतर रुग्ण दुपटीचा कालावधी १,२७६ दिवसांपर्यंत खाली आला आहे. तर रुग्णवाढीचा दर ०.०६ टक्के  झाला आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या ४,७३९ झाली आहे.

मुंबईत एकूण बाधितांची संख्या ७ लाखापुढे गेली आहे. तर एका दिवसात ४३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ७ लाख १४ हजाराहून अधिक म्हणजेच ९७ टक्के  रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. शनिवारी दिवसभरात ४१ हजाराहून अधिक चाचण्या करण्यात आल्या. मुंबईत सध्या एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही. मात्र ४२ इमारती प्रतिबंधित आहेत.

राज्यात ३३९१ बाधित

राज्यात दिवसभरात ३,३९१ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली तर ८० जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात ३८४१ रुग्ण करोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ४७ हजार ९१९ इतकी आहे. गेल्या २४ तासांत ठाण्यांत ६६, नवी मुंबई ७३, कल्याण-डोंबिवली ४३, रायगड ८१, पनवेल ६४, नाशिक ७५, अहमदनगर ६६८, पुणे  जिल्हा ४३१, पुणे शहर १८६, पिंपरी-चिंचवड १११, सोलापूर २१५, सातारा ३००, कोल्हापूर ४१, सांगली ९०, रत्नागिरी ६६, उस्मानाबाद ४१, बीडमध्ये ३९ नव्या रुग्णांची नोंद झाली.