scorecardresearch

रुग्णसंख्या शंभरीआत; दोन वर्षांनंतर राज्यात सर्वात कमी बाधित

करोनाची तिसरी लाट मार्चच्या सुरुवातीपासून वेगाने ओसरत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या दीडशेच्या खाली गेली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : राज्यातील दैनंदिन करोना रुग्णसंख्येत मोठी घट होत असून शनिवारी बाधितांची संख्या शंभरहून कमी म्हणजे ९७ नोंदली गेली. राज्यात एप्रिल २०२० नंतर प्रथमच एवढे कमी रुग्ण आढळले.

करोनाची तिसरी लाट मार्चच्या सुरुवातीपासून वेगाने ओसरत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या दीडशेच्या खाली गेली आहे. शनिवारी तर रुग्णसंख्या १०० च्याही खाली गेली. मृत्यूचे प्रमाणही राज्यात कमी झाले असून शनिवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला. दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही वेगाने घट होत आहे.

सद्य:स्थिती आणि इतिहास..

९७ रुग्णसंख्या आढळली असतानाच २५१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यात एप्रिल २०२०मध्ये करोना रुग्णसंख्या शंभरच्या आत होती. तर यंदा जानेवारीमध्ये तिसरी लाट तीव्रतेने सुरू होती. त्या वेळी दररोज ४० हजारांहून अधिक रुग्ण आढळत होते.

क्षीणस्वरूप..

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१० टक्के आहे. सध्या राज्यात १ हजार ५२५ रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यात सर्वाधिक रुग्ण पुण्यात असून त्यानंतर मुंबई, ठाणे अन्य शहरांचा क्रमांक आहे.

लसीकरणस्थिती

देशात आतापर्यंत करोना लशीच्या १८१ कोटी १९ लाख मात्रा देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दिली. १२ ते १४ वयोगटातील मुलांना १६ लाखाहून अधिक मात्रा देण्यात आल्या, तर दोन कोटी १७ लाखांहून अधिक वर्धक मात्रा आरोग्य सेवेतील कर्माचारी, आघाडीवरील कर्मचारी आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठांना देण्यात आल्या.

देशात काय?

देशभरात गेल्या २४ तासांत २,०७५ करोनाबाधित आढळले, तर ७१ रुग्णांचा मृत्यू झाला. नव्या बाधितांमुळे देशातील आतापर्यंतची रुग्णसंख्या ४,३०,०६,०८० झाली आहे, तर करोना बळींचा आकडा ५,१६,३५२वर पोहोचला आहे.

जगभरात..

’चीनमध्ये सुमारे वर्षभरानंतर शनिवारी करोनाच्या दोन बळीची नोंद. ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ.

’दक्षिण कोरियात गुरुवारी एकाच दिवशी सहा लाख रुग्ण आढळल्याने जगभर पुन्हा चिंता

’आठवडय़ाभरात फ्रान्समधील रुग्णसंख्येत ३५ टक्के, तर इटली आणि ब्रिटनमध्ये प्रत्येकी ४२ टक्के वाढ.

’जागतिक रुग्णसंख्येत सरासरी १२ टक्क्यांनी वृद्धी. जागतिक आरोग्य संघटनेचा दक्षतेचा इशारा

करोना रुग्णसंख्या देशभरात कमी होत असली तरी त्याबाबत सावधगिरी बाळगण्याच्या सूचना केंद्र सरकारने राज्याला दिल्या आहेत. चीन, कोरिया आणि युरोपमधील काही देशांमध्ये करोना रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढल्यामुळे जगात परिस्थिती चिंताजनक बनली आहे.

 – राजेश टोपे, आरोग्यमंत्री.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona virus infection corona positive patient in state hundred patient daily vaccination akp

ताज्या बातम्या