३० जिल्ह्यांत बाधितांचे प्माण १० टक्क्यांहून अधिक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : राज्यात तिसऱ्या करोनालाटेचे प्रारंभस्थान ठरलेल्या मुंबईतील रुग्णसंख्या कमी होत असली तरी इतर जिल्ह्यांमध्ये करोनाप्रसार वेगाने होत आहे. राज्यातील ३० जिल्ह्यांमधील बाधितांचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षाही अधिक आहे.

मुंबईत बाधितांचे प्रमाण आठवड्यात २८ टक्क्यांवरून सुमारे १९ टक्क्यांपर्यत घटले आहे. परिणामी, उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही सुमारे ६८ टक्क्यांनी घट झाली आहे. १२ जानेवारीला मुंबईत सुमारे १ लाख २ हजार रुग्ण उपचाराधीन होते, तर १९ जानेवारीला ही संख्या ३१ हजारांपर्यत खाली आली.

राज्यातील आठवड्याभरातील बाधितांचे प्रमाण ११ जानेवारीला २१ टक्के होते, तर आठवडाभरात म्हणजेच बुधवारपर्यंत त्यात सुमारे दोन टक्क्यांनी वाढ होऊन ते २३ टक्क्यांवर गेले. ११ जानेवारीला राज्यात ११ जिल्ह्यांमध्ये बाधितांचे प्रमाण १० टक्क्यांवर होते. त्यानंतरच्या आठवडाभरात ३० जिल्ह्यांमध्ये बाधितांचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त आढळले.

 राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये करोना संसर्ग वेगाने वाढत आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये बाधितांचे प्रमाण पाच टक्क्यांच्या पुढे आहे. नाशिकमध्ये सध्या करोनाप्रसार वेगाने होत असून, तेथील बाधितांचे प्रमाण आठवड्यात दुपटीहून अधिक वाढून १९ टक्क्यांवरून ३९ टक्के झाले आहे. त्यापाठोपाठ पुण्यामध्येही करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, तेथेही बाधितांचे प्रमाण २० टक्क्यांवरून २८ टक्क्यांवर गेले आहे. रायगडमध्ये २३ वरून ३० टक्के, तर अकोल्यात १५ वरून थेट ३० टक्क्यांवर गेले आहे.

सर्वाधिक उपचाराधीन  रुग्ण पुण्यामध्ये

राज्यात सध्या २ लाख ६७ हजार ६५९ रुग्ण उपचाराधीन आहेत.  पुण्यात सर्वाधिक ६८ हजार ८३४ रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापाठोपाठ ठाणे, मुंबई, रायगड आणि नागपूर या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. राज्यातील सुमारे ७० टक्के उपचाराधीन रुग्ण या पाच जिल्ह्यांमध्ये आहेत.

या जिल्ह्यांत चिंता…

राज्यात नाशिक, पुणे, रायगड, अकोला या जिल्ह्यांसह नांदेड, वर्धा, नागपूर, सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये बाधितांचे प्रमाण २३ टक्क्यांपेक्षाही अधिक आहे़  करोना ग्रामीण भागांत वेगाने पसरत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे़

 राज्यात दिवसभरात ४६,१९७ रुग्ण आढळले, तर ३७ रुग्णांचा मृत्यू झाला़  राज्यात गेल्या २४ तासांत ५२,०२५ रुग्ण करोनामुक्त झाले़  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४़ ५२ टक्के झाले आहे़राज्यभरात २४,२१,५०१ नागरिक गृहविलगीकरणात आहेत़

आठ टक्के बाधित रुग्णालयात

राज्यात संसर्गाचा प्रसार वेगाने वाढत असला तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मात्र घट झाल्याचे आढळले आहे. १० जानेवारीला उपचाराधीन रुग्णांपैकी २९ हजार ११० (सुमारे १४ टक्के) रुग्णालयात दाखल होते. १८ जानेवारीला मात्र यात घट होऊन रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची संख्या २० हजार ५५२ झाली. उपचाराधीन रुग्णांपैकी हे प्रमाण सुमारे आठ टक्के आहे.

देशात ३ लाखांहून अधिक नवे रुग्ण

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत देशात ३,१७,५३२ जणांना करोनाचा संसर्ग झाला. गेल्या २४९ दिवसांतील ही सर्वाधिक संख्या आहे. यामुळे करोनाबाधितांची एकूण संख्या ३,८२,१८,७७३ इतकी झाली़  देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढून १९,२४,०५१ वर पोहोचली असून, ती २३४ दिवसांतील सर्वाधिक आहे. दिवसभरात ४९१ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला असून, करोनाबळींची एकूण संख्या ४,८७,६९३ झाली आहे़

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona virus infection corona positive patient mumbai corona patient high risk akp
First published on: 21-01-2022 at 01:45 IST