scorecardresearch

मुंबईत सुमारे ८८ टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे; कस्तुरबा प्रयोगशाळेतील जनुकीय अहवालातून स्पष्ट

३६३ रुग्णांचे नमुने पालिकेने या आठवडय़ात जनुकीय तपासणीसाठी पाठविले होते.

कस्तुरबा प्रयोगशाळेतील जनुकीय अहवालातून स्पष्ट

मुंबई: शहरात ओमायक्रॉनचे प्रमाण सुमारे ८८ टक्के, तर डेल्टा आणि डेल्टाच्या उपप्रकारांचे प्रमाण सुमारे १० टक्के असल्याचे कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेमध्ये केलेल्या जनुकीय चाचण्यांच्या अहवालामधून स्पष्ट झाले.

३६३ रुग्णांचे नमुने पालिकेने या आठवडय़ात जनुकीय तपासणीसाठी पाठविले होते. त्यातून ३२० जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे आढळले, तर तीन जणांना डेल्टा आणि ३० जणांना डेल्टाच्या उपप्रकरांची लागण झाल्याचे आढळले. याव्यतिरिक्त १० रुग्णांना करोनाच्या अन्य प्रकारच्या विषाणूची बाधा झाली आहे. मुंबईतील तिसरी लाट ओसरते आहे. मागील महिनाभरात मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या २० हजारांपर्यत गेली तरी मृतांचे प्रमाण फारसे वाढलेले नाही. तसेच रुग्णालयात दाखल रुग्णांचे प्रमाणही कमी राहिले. मुंबईत आलेली तिसरी लाट ओमायक्रॉनमुळेच आल्याचे या अहवालावरून स्पष्ट झाले.

राज्याच्या शनिवारच्या अहवालामध्ये मुंबईत ३२० जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग  झाल्याचे जाहीर करण्यात आले. 

या नमुन्यांमध्ये २१ डिसेंबरपासून मृत्यू झालेले रुग्ण, रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण यांचाही समावेश केला होता. या रुग्णांमध्ये प्रामुख्याने डेल्टाचा प्रादुर्भाव झालेला आहे. तसेच एकाच ठिकाणी आढळलेल्या समूह संसर्गातील रुग्णांचेही नमुने दिले होते. ज्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने फुप्फुसांवर परिणाम झालेला आहे. त्यांना डेल्टाची बाधा झाली आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

एस जीन चाचण्यांवर विसंबणे अयोग्य

ओमायक्रॉनमध्येही बीए१, बीए२ आणि बीए३ असे तीन उपप्रकार आहेत. आपल्याकडे यातील कोणत्या प्रकारचे रुग्ण अधिक आहेत याची माहिती जनुकीय चाचण्यांमधून उपलब्ध झालेली नाही. बीए२ प्रकारामध्ये एस जीन आढळत नाही, तर अन्य दोन प्रकारांमध्ये आढळते. त्यामुळे एसजीनची आरटीपीसीआर चाचणी ही ओमायक्रॉनचे निदान करण्यासाठी योग्य आहे असे म्हणता येणार नाही. त्यामुळे या चाचणीवर विसंबून राहणे योग्य नाही. डेल्टा  रुग्णांचे प्रमाण १० टक्के असल्यामुळे जोखमीच्या गटातील व्यक्तींवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, असे करोना कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona virus infection corona positive patient omicron positive patient akp

ताज्या बातम्या