scorecardresearch

लसीकरणाचा वेग मंदावला; करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याचा परिणाम

करोनाची तिसरी लाट मुंबईत बहुतांशपणे ओसरली आहे. दैनंदिन रुग्णसंख्येचे प्रमाणही सुमारे दीडशेच्याही खाली गेले आहे.

करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याचा परिणाम

मुंबई : मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यामुळे लसीकरणाचा वेगही मंदावत आहे. आतापर्यंत सुमारे १८ टक्के ज्येष्ठ नागरिकांनी वर्धक मात्रा, तर १५ टक्के किशोरवयीन मुलांनी लसमात्रा घेतली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांमुळे विद्यार्थी – पालक लसीकरणासाठी पुढे येत नसून परीक्षा संपताच किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचा वेग वाढेल, असा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

करोनाची तिसरी लाट मुंबईत बहुतांशपणे ओसरली आहे. दैनंदिन रुग्णसंख्येचे प्रमाणही सुमारे दीडशेच्याही खाली गेले आहे. सोमवारी तर शहरात दिवसभरात केवळ ९६ नवे रुग्ण आढळले आहेत. संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शहरात लसीकरणाचा जोरही कमी झाला आहे. परिणामी, वर्धक मात्रेवरीही याचा परिणाम झाला आहे. ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होत असल्याच्या भीतीने वर्धक मात्रा घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर रांगा लागत होत्या. यात ६० वर्षांवरील नागरिकांचीची संख्या अधिक होती. परंतु फेब्रुवारीपासून लाट वेगाने ओसरत आल्यामुळे वर्धक मात्रा घेणाऱ्यांच्या संख्येतही घट झाल्याचे आढळले आहे. 

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात शहरात दरदिवशी सुमारे ९ ते १० हजार जणांना वर्धक मात्रा दिली जात होती. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये यात घट होऊन हे प्रमाण सुमारे अडीच हजारांवर आले आहे. शहरात सुमारे १० लाख ६६ हजार ज्येष्ठ नागरिकांनी दुसरी मात्रा घेतलेली आहे. यातील १८ टक्के म्हणजे १ लाख ९२ हजार नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली आहे. आतापर्यत शहरात एकूण ३ लाख २७ हजार ५५८ जणांनी वर्धक मात्रा घेतली आहे.

सरकारी केंद्रांवर प्रमाण अधिक

खासगी रुग्णालयांच्या तुलनेत सरकारी किंवा पालिकेच्या लसीकरण केंद्रावर वर्धक मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. आतापर्यत झालेल्या लसीकरणामध्ये खासगी रुग्णालयात १५ टक्के म्हणजे ४९ हजार ७७६ जणांनी वर्धक मात्रा घेतली आहे. तिसऱ्या लाटेमध्ये बहुतांश आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी करोनाबाधित झाले होते. त्यामुळे या गटामध्ये वर्धक मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण तुलनेने फार कमी आहे. करोनाबाधित झाल्यानंतर सुमारे तीन महिन्यांनी वर्धक मात्रा घेता येईल. त्यामुळे यातील बहुतांश कर्मचारी एप्रिलनंतर वर्धक मात्रेसाठी पात्र होतील, असे पालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

परीक्षांमुळे वेग कमी 

पालिकेच्या केंद्रांवर दरदिवशी एक लाख जणांचे लसीकरण करण्याची क्षमता आहे. मात्र सध्या दिवसाला जेमतेम ४० ते ४५ हजार नागरिकांचेच लसीकरण होत आहे. किशोरवयीन मुला-मुलींच्या लसीकरणाला अद्याप पुरेसा वेग आलेला नाही. दिवसाला सुमारे वीस हजारांहून कमी मुले लसीकरणासाठी पुढे येत आहेत. त्यातही पहिली मात्रा घेण्यासाठी येणाऱ्या मुलांची संख्याही रोडावली असून दिवसाला केवळ तीन हजार मुले पहिल्या मात्रेसाठी येत आहेत. परीक्षा हे यामागचे कारण असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  पंधरा ते अठरा वयोगटात बहुतांशी नववी, दहावी, अकरावी व बारावीत शिकत असणाऱ्या मुलांचा समावेश आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा तोंडावर असून त्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा, पूर्व परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे लस घेण्यास विद्यार्थी व पालक पुढे येत नसावेत, अशी शक्यता अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी व्यक्त केली.

९ लाखांचे उद्दीष्टय़ 

मुंबई महानगरात १५ ते १८ वर्ष वयोगटाचा विचार करता, राज्य शासनाने ६ लाख १२ हजार ४६१ नवयुवकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट नेमून दिले आहे. मात्र मुंबई महानगरपालिका प्रशासनाने २०२१ च्या अंदाजित लोकसंख्येच्या आधारावर सुमारे ९ लाख २२ हजार नवयुवकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आतापर्यंत केवळ १ लाख ३८ हजार ५६१ मुलांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. हे प्रमाण केवळ १५ टक्के आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona virus infection corona vaccination akp 94