scorecardresearch

वर्धक मात्रेला कमी प्रतिसाद; अत्यावश्यक सेवेतील पाच टक्के कर्मचाऱ्यांचेच लसीकरण

आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तिसऱ्या लाटेमध्ये बाधित होण्याचा धोका अधिक असल्यामुळे या वर्गासाठी वर्धक मात्रा सोमवारपासून सुरू केली आहे.

covid-vaccine vaccination
(प्रातिनिधिक छायाचित्र)

अत्यावश्यक सेवेतील पाच टक्के कर्मचाऱ्यांचेच लसीकरण

मुंबई : राज्यात सोमवारपासून सुरू झालेल्या वर्धक मात्रेला आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद तुलनेने कमी मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे. दोन्ही मात्रा घेतलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे १९ लाख ७२ हजार असून यातील केवळ पाच टक्के कर्मचाऱ्यांनी वर्धक मात्रा घेतली आहे.

आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तिसऱ्या लाटेमध्ये बाधित होण्याचा धोका अधिक असल्यामुळे या वर्गासाठी वर्धक मात्रा सोमवारपासून सुरू केली आहे. वर्धक मात्रेसाठी आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने येत असले तरी त्या तुलनेमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मात्र लसीकरणासाठी येत नसल्याचे आढळले आहे.

बुधवारच्या आकडेवारीनुसार, राज्यात १ लाख ३४ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी वर्धक मात्रा घेतली आहे. दोन्ही मात्रा घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या ११ लाख ७६ हजार असून यातील ११ टक्के कर्मचाऱ्यांनी वर्धक मात्रा

तीन दिवसांत घेतली आहे. या तुलनेत अत्यावश्यक सेवेतील १ लाख १ हजार कर्मचाऱ्यांनी वर्धक मात्रा घेतली आहे. एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत हे प्रमाण पाच टक्के आहे.

सर्वाधिक वर्धक मात्रेचे लसीकरण मुंबईत झाले असून मुंबईतही अत्यावश्यक कर्मचाऱ्यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. मुंबईत ३० हजार ५६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी तर ३१ हजार ९७६ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी ही मात्रा घेतली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तुलनेत मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. मुंबईत १ लाख ८७ हजार आरोग्य कर्मचारी तर सुमारे २ लाख ३५ हजार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी दोन मात्रा घेतलेल्या आहेत. राज्यात अन्य जिल्ह्यांमध्येही हेच चित्र आढळत असल्याचे दिसून येत आहे.

वर्धक मात्रा घेतल्यानंतरही डॉक्टर बाधित

वसई : करोना प्रतिबंधक लशीची वर्धक मात्रा घेऊनही वसई-विरार महापालिकेच्या महिला डॉक्टरला करोनाचा संसर्ग झाला आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. भक्ती तळेकर या वसई-विरार महापालिकेच्या सातिवली येथील माता बालसंगोपन केंद्रात काम करतात. त्यांनी करोना प्रतिबंधक लशींच्या दोन्ही मात्रा घेतल्या होत्या. नुकतीच त्यांनी वर्धक मात्रा घेतली होती. परंतु सर्दी-तापाची लक्षणे दिसल्यावर खबरदारी म्हणून त्यांनी करोना चाचणी केली. त्यात त्यांना करोना संसर्ग झाल्याचे आढळले. परंतु सौम्य लक्षणे असल्याने त्या सध्या गृहविलगीकरणात आहेत.

जानेवारीच्या उत्तरार्धात संख्या वाढणार?

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या दोन्ही मात्रा मार्चपर्यत पूर्ण झाल्यामुळे यातील बहुतांश जण आता वर्धक मात्रेसाठी पात्र आहेत. परंतु अत्यावश्यक सेवेतील अनेक कर्मचाऱ्यांची दुसरी मात्रा ही मार्चनंतर झाली आहे. त्यामुळे यातील बरेचजण या मात्रेसाठी पात्र झालेले नाहीत. जानेवारीच्या शेवटी अनेकजण पात्र होतील. त्यामुळे जानेवारीच्या उत्तरार्धात या गटामध्येही प्रतिबंधात्मक मात्रेचे लसीकऱण वाढण्याची शक्यता आहे, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona virus infection corona vaccination booster dose health care akp worker

ताज्या बातम्या