दिवसभरात लाखांहून अधिक महिलांचे लसीकरण

मुंबईतील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवसभरात एक लाखाहून अधिक महिलांनी लस घेतली.

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने शुक्रवारी सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष लसीकरण सत्र राबवले गेले. त्यात दिवसभरात एकूण १ लाख २७ हजार महिलांनी लस घेतली. या सत्रात महिलांना थेट येवून (वॉक इन) लसीची पहिली किंवा दुसरी मात्रा घेण्याची मुभा देण्यात आली होती.

करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेतंर्गत मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष लसीकरण सत्र राबवण्यात आले होते. लसीकरणामध्ये महिलांचे प्रमाण वाढावे यासाठी हे खास सत्र आयोजित करण्यात आले होते. या विशेष सत्राकरिता ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात आली होती. या विशेष सत्राला मुंबईतील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवसभरात एक लाखाहून अधिक महिलांनी लस घेतली.

अनेक महिला घराबाहेर पडत नाहीत, त्यामुळे त्या लसीकरणासाठीही पुढे येत नाहीत, तसेच काही महिला स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक नसतात. त्यामुळे अशा सर्व महिलांनी लसीकरणासाठी पुढे यावे म्हणून महिलांसाठी राखीव लसीकरण ठेवण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. पालिके च्या केंद्रावर आज १ लाख ३ हजार महिलांनी लस घेतली. त्यापैकी ६१ हजाराहून अधिक महिलांनी पहिली मात्रा घेतली. तर सरकारी केंद्रांवर ५,९१० महिलांनी लस घेतली. त्यापैकी २,३४४ महिलांनी पहिली मात्रा घेतली. तर खासगी केंद्रावर ४२ हजाराहून अधिक नागरिकांनी लस घेतली असून त्यातही महिलांचा समावेश होता.

मुंबईत आतापर्यंत १ कोटी ९ लाख ८६ हजार नागरिकांनी लस घेतली. त्यापैकी ३३ लाख ३१ हजाराहून अधिक नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली आहे. याचबरोबर अंथरूणाला खिळलेल्या १२४ अपंगांनाही दिवसभरात लस देण्यात आली. तर परदेशात जाणाऱ्या २६ जणांनी देखील लस घेतली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona virus infection corona vaccination day women akp

ताज्या बातम्या