तूर्त नवे निर्बंध नाहीत!

करोनाची तिसरी लाट येणार असल्याने सावधगिरीची गरज असली तरी घाबरून जाण्याचे कारण नाही.

लसीकरणावर भर देण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

मुंबई : सणासुदीच्या काळात गर्दी टाळण्यासाठी कठोर निर्बंध किं वा रात्रीची संचारबंदी लागू करावी, अशी सूचना केंद्र सरकारने केली असली तरी राज्याने आणखी प्रतीक्षा करण्याचे संकेत दिले आहेत. तात्काळ नव्याने निर्बंध, रात्रीची संचारबंदी लागू न करण्याचे सूतोवाच राज्य सरकारने केले आहे. करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या भीतीच्या पाश्र्वाभूमीवर लसीकरणावर भर देण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली.

राज्यात सप्टेंबरअखेर किंवा ऑक्टोबरच्या पूर्वार्धात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. तसेच पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राबवलेल्या सार्वत्रिक लसीकरण मोहिमेच्या धर्तीवर राज्यात आपापल्या भागांत लसीकरण मोहीम राबवण्याची सूचना ठाकरे यांनी केली.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करोनाविषयक परिस्थितीवर चर्चा झाली. जगात सी. १.२. हा करोनाचा नवा विषाणू पसरत असल्याने त्याबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. उत्तर प्रदेशात प्लेगसदृश एका नवीन रोगाची साथ पसरली असून नागपूर परिसरात काही रुग्ण आढळल्याची माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली.

करोनाची तिसरी लाट येणार असल्याने सावधगिरीची गरज असली तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. रुग्णांच्या उपचारांसाठी पुरेशी आरोग्य व्यवस्था, उपकरणे, औषधे, इंजेक्शन, प्राणवायू यांची सोय के ल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील व लोकांवर व्यवस्थित उपचार करता येतील. सर्वांनी आपल्या भागात याबाबत योग्यरीतीने काम होत आहे की नाही हे पाहावे. तसेच वैयक्तिक संपर्क , खासगी दवाखान्यांकडील कोटा अशा विविध माध्यमांतून लशी मिळवून सार्वत्रिक लसीकरण मोहीम राबवावी, अशी सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्र्यांना केली.

रविवारी वैद्यकीय परिषद

महाराष्ट्रात सप्टेंबरअखेरीस किंवा ऑक्टोबरच्या पूर्वार्धात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. त्यासाठी रविवारी ५ सप्टेंबरला कृतिगटाच्या तज्ज्ञांसह वैद्यकीय परिषद होणार आहे. डॉक्टर, राज्यातील नागरिकांनाही या परिषदेत ऑनलाइन सहभागी होऊन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल.

राज्यात किंचित रुग्णवाढ

मुंबई : राज्यात बुधवारी करोनाचे ४,४५६ नवे रुग्ण आढळले. दिवसभरात १८३ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत बुधवारी किंचित रुग्णवाढ नोंदविण्यात आली. राज्यात दिवसभरात ४,४३० रुग्ण करोनामुक्त झाले असून, उपचाराधीन रुग्णांची संख्या ५१ हजार ७८ इतकी आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ४१६, रायगड ६२, अहमदनगर ६५३,

पुणे ६०८, पुणे शहर ३२४, पिंपरी-चिंचवड १६७, सोलापूर ३६७, सातारा ५४८, कोल्हापूर ६७, सांगली २१२, रत्नागिरी १२५, बीड ७९ नवे रुग्ण आढळले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Corona virus infection festival restriction curfew corona third wave akp