तिसऱ्या लाटेची भीती, चाचण्या मात्र कमी!

राज्य कृती दलाचे डॉक्टर सातत्याने गेले काही महिने करोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यास सांगत आहेत.

|| संदीप आचार्य
मुंबई : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ‘मंदिरांपेक्षा आरोग्य मंदिरे उभारा’ असे सांगत करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत सतत सावधगिरी बाळगण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे देत आहेत. तरीही ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये करोना चाचण्या कमी प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे.

राज्य कृती दलाचे डॉक्टर सातत्याने गेले काही महिने करोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यास सांगत आहेत. प्रामुख्याने डेल्टा, डेल्टा प्लस व म्यॅवच्या पार्श्वभूमीवर चाचण्या वाढवणे, रुग्ण तसेच रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेणे आणि मुखपट्टी व सुरक्षित अंतराचा वापर करण्याचे आवाहन करत आहेत. याशिवाय सक्रिय रुग्णसंख्या जास्त असलेल्या पुणे, सातारा, ठाणे, अहमदनगर व मुंबई या पहिल्या पाच जिल्ह्यांत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले असले तरी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करोनाचे नियम सर्रास पायदळी तुडवून जागोजागी खरेदीसाठी लोकांची प्रचंड झुंबड उडालेली दिसून येते. या पार्श्वभूमीवर किमान करोना चाचण्यांच्या संख्येचा वेग वाढवणे अपेक्षित असताना ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात खूप कमी चाचण्या करण्यात आल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. ऑगस्टमध्ये नऊ दिवस रोज दोन लाखांपेक्षा जास्त चाचण्या करण्यात आल्या, तर संपूर्ण महिन्याचा विचार करता दररोज जवळपास एक लाख ८५ हजारांपेक्षा जास्त चाचण्या करण्यात आल्या होत्या.

त्यातुलनेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ७ सप्टेंबरपर्यंत सरासरी एक लाख ६० हजारच्या आगेमागे चाचण्या करण्यात आल्या आहेत. आजपर्यंत राज्यात पाच कोटी ५१ लाख चाचण्या झाल्या असल्या तरी चाचण्यांचा वेग वाढवणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आजही पुण्यात सक्रिय रुग्णांची संख्या १२ हजार ४०९ आहे, तर ठाणे ७४५९, सातारा ५६०६, अहमदनगर ५३३१ आणि मुंबईत ४१६५ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आजघडीला ४७ हजार ९२६ सक्रिय रुग्ण असून त्यापैकी २४ हजार २८४ रुग्ण म्हणजे ५०.०९ टक्के रुग्ण उपचारांसाठी रुग्णालयात दाखल आहेत. त्यातच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून वारंवार आवाहन करूनही करोना नियमावलींचे पालन होत नसल्याने कृती दलाच्या डॉक्टरांकडूनही चिंता व्यक्त करण्यात येत असून किमान चाचण्यांची संख्या वाढवा असे त्यांचे म्हणणे आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona virus infection ganesh festival corona third wave corona test corona vaccine akp