अतिरिक्त यंत्रसामग्रीची यादी तयार करण्याचे आदेश

मुंबई : जम्बो करोना केंद्रातील पोर्टेबल कृत्रिम श्वसनयंत्रणा, खाटा, रक्त तपासण्याची यंत्रे यांसारख्या अतिरिक्त यंत्रसामग्रीचा वापर मुंबईतील पालिकेच्या प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये केला जाणार आहे. सामग्रीचा वापर योग्यरितीने होण्यासाठी आणि ही रुग्णालये अधिक सक्षम करण्याच्या उद्देशातून पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

 शहरात सध्या रुग्णसंख्या कमी असल्यामुळे जम्बो रुग्णालयांमध्ये तुरळक रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत, तर ८० टक्क्यांहून अधिक खाटा रिक्त आहे. दीड ते दोन हजार खाटांच्या क्षमतेच्या या जम्बो करोना केंद्रामध्ये रुग्णांसाठी कृत्रिम श्वसनयंत्रणेसह, प्राणवायू यंत्रे, क्ष किरण यंत्र, खाटा इत्यादी यंत्र आणि सामग्री पालिकेने करोनाच्या साथीमध्ये खरेदी केली. परंतु रुग्णांची संख्या कमी असल्यामुळे या रुग्णालयांमधील एक ते दोन वॉर्डच सध्या सुरू आहेत. परिणामी इतर सामग्रीचा सध्या वापर केला जात नाही. या सामग्रीचा योग्य वापर करण्याच्या उद्देशाने पालिकेच्या प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये आवश्यकतेनुसार यांचा पुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

यंत्रसामग्री जितकी वापरात असते, तितकी ती अधिक कार्यक्षम राहते. रुग्णसंख्या कमी असल्यामुळे वापरात नसणाऱ्या यंत्रसामग्रीची यादी तयार करण्याचे आदेश सातही जम्बो केंद्रांना दिले आहेत. ही यादी उपनगरीय रुग्णालयांना प्राधान्याने दिली जाईल. त्यांना आवश्यक त्या वस्तू निवडण्याची मुभा असेल. त्यानुसार ही यंत्रसामुग्री रुग्णालयांना वापरण्यास दिली जाईल. प्रमुख रुग्णालयांसाठी ही आवश्यक ती यंत्रे यातून पुरविण्यात    येतील, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

सध्या नेस्कोमध्ये अनेक खाटांसह पोर्टेबल कृत्रिम श्वसन यंत्रणा, खाटांच्या बाजूला असलेली कपाटे अशी बरीच यंत्रसामुग्री अतिरिक्त असल्याचे आम्ही आरोग्य विभागाला कळविले आहे. यातील काही सामानांचा वापर नव्याने सुरू होत असलेल्या दंतमहाविद्यालयाच्या इमारतीसाठी करण्याचा प्रस्तावही दिलेला आहे. याप्रमाणे अतिरिक्त सामानाची यादी करत असल्याचे नेस्को करोना केंद्राच्या अधिष्ठाता डॉ. निलम अंद्राडे यांनी सांगितले.

मुलुंडच्या करोना केंद्रामध्ये सध्या २५ रुग्ण दाखल आहेत. रुग्णालयाची क्षमता १६५० खाटांची आहे. त्यामुळे जे अतिरिक्त सामान आहे याचा वापर उपनगरीय रुग्णालयांमध्ये नक्कीच केला जाऊ शकतो. आरोग्य विभागाच्या आदेशानुसार अतिरिक्त सामानाची यादी बनविण्याचे काम सध्या सुरू आहे. अतिरिक्त औषधे, मुखपट्टी, सलाइन बाटल्या असे अनेक सामान आम्ही नुकतेच सेव्हन हिल्स, मुलुंडचे अग्ररवाल रुग्णालय आणि कूपर रुग्णालयाला दिले आहे, असे मुलुंड जम्बो करोना केंद्राचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप आंग्रे यांनी सांगितले.

‘नायर’च्या नव्या इमारतीसाठी वापर

नायरच्या दंत महाविद्यालयातील नव्याने सुरू होणार असलेल्या इमारतीमध्ये यातील काही सामानाचा वापर केला जाईल, जेणेकरून नव्याने सामान खरेदी करावे लागणार नाही. तसेच अतिरिक्त सामानांची यादी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या रुग्णांसाठी आवश्यक त्या बाबी रुग्णालयातच राहतील, असेही काकाणी यांनी स्पष्ट केले.