रुग्णसंख्येत घट कायम; मुंबईत २,५५० नवे बाधित

शहरातील मृतांची संख्या मात्र काही अंशी वाढली आहे. रविवारी १३ रुग्णांचा मृत्यू झाला असून यातील ११ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते.

मुंबई: मुंबईत तिसरी लाट ओसरायला सुरुवात झाली असून मागील दोन दिवसांमध्ये रुग्णसंख्येत घट होत आहे. रविवारी मुंबईत २ हजार ५५० नवे रुग्ण आढळले आहेत, तर १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात रुग्णसंख्येत घट होत असल्यामुळे उपचाराधीन रुग्णांचा आलेखही उताराला लागला आहे. शहरात सध्या १९ हजार ८०८ रुग्ण उपचाराधीन आहेत. रविवारी नव्याने आढळलेल्या २ हजार ५५० रुग्णांपैकी ३३७ रुग्णांना रुग्णालयात दाखल केले आहे. यातील ४० रुग्णांना प्राणवायू लावावा लागला आहे. रुग्णालयातील दाखल रुग्णांचे प्रमाणही कमी होऊन आता सुमारे ११ टक्क्यांवर आले आहे. रविवारी २१७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

शहरातील मृतांची संख्या मात्र काही अंशी वाढली आहे. रविवारी १३ रुग्णांचा मृत्यू झाला असून यातील ११ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. यातील १२ रुग्ण ६० वर्षांवरील होते. शहरातील प्रतिबंधित इमारतीची संख्याही कमी होत असून सध्या २४ इमारती प्रतिबंधित आहेत.

ठाणे जिल्ह्यात २,२३४ नवे बाधित

ठाणे : ठाणे जिल्ह्यात रविवारी २ हजार २३४ करोना रुग्ण आढळून आले आहेत. तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  जिल्ह्यात आढळून आलेल्या एकूण २ हजार २३४ करोना रुग्णांपैकी नवी मुंबई १ हजार १०, ठाणे ४६१, कल्याण- डोंबिवली २५५, मीरा- भाईंदर १६८, ठाणे ग्रामीण १३२, उल्हासनगर ८०, अंबरनाथ ५६, बदलापूर ४५ आणि भिवंडीमध्ये २७ रुग्ण आढळून आले आहेत. तर मृतांमध्ये नवी मुंबई दोन, कल्याण-डोंबिवली दोन आणि मीरा-भाईंदरमधील एका रुग्णाचा समावेश आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona virus infection positive patient in mumbai akp

Next Story
मागासवर्ग आयोगाची कार्यकक्षा बदलण्यास आव्हान
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी