मुंबई : करोना विषाणू साथीच्या दहशतीखाली गेले दीड वर्ष झाकोळलेल्या मनोरंजन क्षेत्रात शुक्रवारी चैतन्य सळसळले. प्रदीर्घ कालावधीनंतर चित्रपट-नाट्यगृहांचा पडदा उघडल्याने मनोरंजनाची कवाडे खुली झाली. अनेक चित्रपटगृहांमध्ये शुक्रवारी नव्या सिनेमांचा ‘खेळ’ सुरू झाला, तर काही चित्रपटगृहांना मात्र प्रेक्षकांची प्रतीक्षा करावी लागली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना मार्गदर्शक तत्त्वे पाळून आणि हिंदी – इंग्रजी चित्रपटांचे खेळ लावून राज्यातील चित्रपटगृहांनी शुक्र्रवारपासून पुन्हा सुरुवात केली. पहिल्याच दिवशी ‘बेल बॉटम’ आणि ‘नो टाइम टू डाय’ या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दोन ते तीन चित्रपटांना लाभलेली प्रेक्षकसंख्या चित्रपटगृहांना दिलासा देणारी बाब आहे. काही ठिकाणी मात्र प्रेक्षक नसल्यामुळे खेळ रद्द करावे लागले. 

नाट्यगृहांचा पडदाही शुक्रवारी उघडला, परंतु वांद्रे येथील रंगशारदा नाट्यगृहात रंगलेल्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा खास प्रयोग वगळता शुक्रवारी नाटकांचे प्रयोग झाले नाहीत. आज, शनिवारी मात्र काही नाट्यगृहांमध्ये विविध नाटकांचे प्रयोग होणार आहेत. 

मुंबई आणि उपनगरातही अंधेरी, कांदिवली, मालाड परिसरातील चित्रपटगृहांमध्ये शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या आणि अक्षयकुमारची मुख्य भूमिका असलेल्या ‘बेल बॉटम’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. याशिवाय, ‘नो टाइम टू डाय’ या बॉण्डपटासह ‘वेनॉम – लेट देअर बी कार्नेज’ या चित्रपटालाही राज्यात प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. ‘बेल बॉटम’ हा चित्रपट दोन महिन्यांपूर्वी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला, शिवाय ओटीटीवरही प्रदर्शित करण्यात आला आहे. तरीही हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात हजेरी लावली. तर ‘वेनॉम – लेट देअर बी कार्नेज’ हा चित्रपट देशभरात आठवड्यापूर्वी प्रदर्शित झाला. आत्तापर्यंत या चित्रपटाने २१.३० कोटींची कमाई के ली असून चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहता महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर येथे ११५ चित्रपटगृहांमधून या चित्रपटाचे खेळ वाढवण्यात आले आहेत.

शनिवार – रविवार या दोन दिवसांत ‘बेल बॉटम’ आणि ‘नो टाइम टू डाय’ या चित्रपटांची चांगली तिकीटविक्री झाल्याचे दिसत आहे. हळूहळू प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढत जाईल अशी अपेक्षा चित्रपटगृह व्यावसायिकांनी व्यक्त केली. आम्ही लसीकरण पूर्ण झालेल्या प्रेक्षकांचे स्वागत करत आहोत, अशी प्रतिक्रिया पीव्हीआर लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम दत्ता यांनी व्यक्त के ली.

सकाळी ९ ते १० दरम्यानच्या सर्व मोफत खेळांना (मॉर्निंग शो) महाराष्ट्रातील आमच्या सर्व बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये उत्साही प्रतिसाद मिळाल्याचे ‘आयनॉक्स लीजर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक टंडन यांनी सांगितले. ‘सूर्यवंशी’, ‘८३’, ‘बंटी और बबली २’, ‘तडप’, ‘चंदीगढ करे आशिकी’, ‘मॅट्रिक्स ४’, ‘पुष्पा’, ‘जर्सी’ आणि ‘इटर्नल्स’ यांसारख्या हिंदी, इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांमधील वीसहून अधिक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. याशिवाय, चित्रपटांबरोबरच ‘आयसीसी’च्या टी-२० विश्वाचषक स्पर्धेत खेळवले जाणारे सामनेही आम्ही चित्रपटगृहांतून दाखवणार आहोत. आज दिवसभरातील एकूण तिकीटविक्रीचे आकडे पाहता करोनापूर्व दिवसांची आठवण झाली’, अशी भावनाही टंडन यांनी व्यक्त के ली.

‘नाट्यरसिकांबद्दल सरकार असंवेदनशील’

वांद्रे येथील रंगशारदा नाट्यगृहात रंगलेल्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाच्या खास प्रयोगामध्ये रंगभूमीवरील तंत्रज्ञ आणि कलाकारांना करोना काळात मदत करणाऱ्या अशोक हांडे, प्रशांत दामले, बाबू राणे, प्रीती जामकर, रत्नाकर जगताप आणि हरी पाटणकर यांचा भाजपनेते आमदार आशीष शेलार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. करोना संकटामुळे प्रथमच मराठी रंगभूमीचा पडदा पडला होता, परंतु मराठी रंगभूमीला सवलत देण्यास सरकारने विलंब केला, अशी टीका शेलार यांनी के ला. मद्य आणि मद्यप्रेमींची सरकारने फार काळ ताटातूट होऊ दिली नाही, नाट्यरसिकांचा मात्र तेवढ्या संवेदनशीलतेने सरकारने विचार के ला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

सिनेमानंदाचे दिवस पुन्हा…  मुंबई आणि उपनगरांतील चित्रपटगृहांमध्ये शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘बेल बॉटम’ आणि  ‘नो टाइम टू डाय’ या चित्रपटांना पाहण्यासाठी तरुणाई लोटली होती. करोना काळामध्ये ‘ओटीटी’च्या फलाटाद्वारे गेले दीड वर्ष घरातील छोट्या पडद्यावर सिनेमाची भूक भागविणाऱ्या सिनेवेड्यांना चित्रपटगृहाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या पडद्याचा अनुभव घ्यायचा होता.

रंगशारदामध्ये ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’

वांद्रे येथील रंगशारदा नाट्यगृहात ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा खास प्रयोग शुक्रवारी रंगला. भाजप नेते आमदार अ‍ॅड्. आशीष शेलार यांच्या पुढाकाराने रंगशारदा नाट्यगृहाचा पडदा समारंभपूर्वक उघडण्यात आला.

महाराष्ट्र आणि विशेषत: मुंबईचे रसिक चित्रपटगृहे पुन्हा सुरू होण्याची वाट पाहत होते. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला लाभला.          – आलोक टंडन, मुख्य कार्यकारी         अधिकारी, आयनॉक्स लीजर

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona virus infection recreation area the curtains of movie theaters opened akp
First published on: 23-10-2021 at 01:21 IST