महाराष्ट्रातील शहरी भागास करोना काळात बेरोजगारीचा मोठा फटका बसल्याचे तुलनात्मक आकडेवारीतून दिसून आले आहे. बेरोजगारीचा शहरी भागातील दर गेल्या वर्षी एप्रिल-जूनमध्ये ३५.६ टक्के तर जुलै-सप्टेंबर या काळात २२.६ टक्के होता. बेरोजगारीच्या अनुक्रमे २०.९ व १२.३ टक्के या सरासरी दरापेक्षा महाराष्ट्राच्या शहरी भागात बेरोजगारीचा दर अधिक होता.

जुलै ते सप्टेंबर २०२० या काळातील मनुष्यबळाचा तिमाही अहवाल उपलब्ध झाला असून त्यानुसार झारखंडमध्ये बेरोजगारीचा दर या दोन तिमाहीत ३२ टक्के व १९.८ टक्के होता. काही विश्लेषकांच्या मते चालू साप्ताहिक दरात आठवड्यानुसार व्यक्तीच्या रोजगाराची स्थिती समजत असते त्यामुळे जर कुणाला लाभदायक काम नसेल तर दर दिवशी दर तासाला त्याची नोंद घेतली जात असते. केरळात बेरोजगारीचा दर एप्रिल ते जून २०२० या काळात २७.३ टक्के होता तर जुलै ते सप्टेंबर २०२० या काळात तो १८.९ टक्के होता.

जम्मू-काश्मीर बेरोजगारीत चौथे राज्य ठरले असून तेथे जुलै ते सप्टेंबर २०२० या काळात बेरोजगारीचा दर १७.४ टक्के होता. त्यानंतर ओडिशा व तेलंगणात हा दर अनुक्रमे १६.५ टक्के व १५.४ टक्के होता.  तिमाही पीएलएफएस अहवालानुसार दिल्लीत एप्रिल ते जून २०२० या काळात बेरोजगारीचा दर कमी म्हणजे १०.५ टक्के होता तर जुलै ते सप्टेंबर २०२० या काळात तो ४.५ टक्के होता. जुलै ते सप्टेंबर या काळात पुरुष व महिलांमध्ये बेरोजगारीचा दर आधीच्या तिमाहीच्या तुलनेत १२.६ व १५.८ टक्के झाला तो आधीच्या तिमाहीत २०.८ टक्के व २१.२ टक्के होता.

जुलै-सप्टेंबर २०१९ या काळात बेरोजगारीचा दर पुरुषात ८ टक्के तर महिलात ९.७ टक्के होता. कामगार सहभाग दर म्हणजे लोकसंख्येच्या तुलनेत काम असलेल्यांचा दर हा जुलै ते सप्टेंबर या काळात सर्व वयोगटात ३७ टक्के होता तर गेल्या तिमाहीत तो ३५.९ टक्के होता. जानेवारी ते मार्च २०२० मध्ये तो ३७.५ टक्के होता. लोकसंख्यात्मक कामगार प्रमाण हे गेल्यावर्षीच्या जुलै ते सप्टेंबर २०२० दरम्यान २८.४ टक्क्यांवरून ३२.१ टक्के झाले. गेल्या वर्षी जानेवारी ते मार्च या काळात हे प्रमाण ३४.१ टक्के होते. जुलै २०१९ ते २०२० या काळातील बेरोजगारीचा दर २०१९-२०२० मध्ये ८.८ टक्के होता.