बालविवाह थांबविण्यास ‘युनिसेफ’चा हात

करोनामुळे पालकांचा मृत्यू, गरीबी, अशा अनेक कारणांमुळे कमी वयातच मुलींची लग्ने लावून कुटुंबावरील जबाबदारी कमी केली जात आहे.

राज्यात करोना काळात ७९० प्रकार उघडकीस; मोहीम तीव्र

मुंबई : करोना प्रादुर्भावाच्या काळात राज्यात ७९० बालविवाह थांबवण्यात यश आले असून यापुढेही बालविवाहांना आळा घालण्यासाठी महिला व बाल विकास विभाग, युनिसेफ आणि अक्षरा सेंटर यांच्यातर्फे  ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये राज्यव्यापी मोहीम राबवण्यात येणार आहे.

करोनामुळे शाळा बंद झाल्या, मित्रमैत्रिणी व आधार देणाऱ्या संस्थांशी संपर्क तुटला त्यातच घरातील आर्थिक स्थिती बिकट झाल्यामुळे अनेक मुलींची विविध प्रकारे कुचंबणा होत आहे.  करोनामुळे पालकांचा मृत्यू, गरीबी, अशा अनेक कारणांमुळे कमी वयातच मुलींची लग्ने लावून कुटुंबावरील जबाबदारी कमी केली जात आहे.

टाळेबंदीचे नियम व प्रवासावर बंधने असण्याच्या काळात, गेल्या वर्षभरात महिला व बालकल्याण विभाग, चाइल्डलाईन, पोलिस आणि सामाजिक संघटना यांनी एकत्र येऊन सोलापूर जिल्ह्यात ८८, औरंगाबादमध्ये ६२, उस्मानाबाद आणि नांदेडमध्ये प्रत्येकी ४५, यवतमाळमध्ये ४२ आणि बीडमध्ये ४० बालविवाह थांबवले आहेत.

उपक्रम कोणते?

बालविवाह रोखण्यासाठी प्रचार-प्रसार साहित्याची देवाणघेवाण, समाजमाध्यमांच्या माध्यमातून बालविवाह रोखणाऱ्या मुलींच्या कथांना प्रसिद्धी देणे, पालकांना समुपदेशन, या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना या कामाशी जोडून घेणे असे उपक्रम राबवले जाणार आहेत. या मोहिमेस महिला व बालविकास मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर, युनिसेफ महाराष्ट्रच्या प्रमुख राजेश्वरी चंद्रशेखर, अक्षरा सेंटरच्या सहसंचालक नंदिता शाह यांच्या उपस्थितीत बुधवारी सुरूवात करण्यात आली.

महाराष्ट्राचा देशात बालविवाहांच्या बाबतीत पहिल्या पाच राज्यांमध्ये समाविष्ट होतो, मात्र गेल्या २० वर्षांतील माहितीनुसार यामध्ये सकारात्मक घट होत आहे. महाराष्ट्रातील बालविवाहांचे प्रमाण १९९८ मध्ये ४७.७ टक्के होते, ते २०१९ मध्ये २१.९ टक्क्यांपर्यंत घटले. मात्र करोनाच्या काळात राज्यातील पाचपैकी एक विवाह हा बालविवाह आहे. – राजेश्वरी चंद्रशेखर, ‘युनिसेफ महाराष्ट्र’ प्रमुख

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona virus infection unicef child marriage corona school economic situation is dire akp

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या