मुंबईत जन्मदरामध्ये घट

करोना साथीच्या उद्रेकाचा परिणाम मुंबईतील जन्मदरावर झाल्याचे पालिकेच्या आकडेवारीतून आढळले आहे.

|| शैलजा तिवले

टाळेबंदीमुळे कुटुंबे स्थलांतरित झाल्याचा परिणाम

मुंबई : करोना साथीच्या काळात टाळेबंदीमुळे मोठ्या प्रमाणात कुटुंबे शहराबाहेर स्थलांतरित झाल्यामुळे २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये जन्मदरात सुमारे २६ टक्क्यांनी घट झाली आहे. २०१५ नंतर प्रथमच एवढी मोठी घट  जन्मदरामध्ये झाल्याचे आढळले आहे.

करोना साथीच्या उद्रेकाचा परिणाम मुंबईतील जन्मदरावर झाल्याचे पालिकेच्या आकडेवारीतून आढळले आहे. २०१५ मध्ये १ लाख ७४ हजार बालकांचा जन्म झाला होता. त्यानंतर २०१६ मध्ये यात २१ हजार ९५० ने घट होत सुमारे १ लाख ५२ हजार बालके जन्माला आली. त्यानंतर उत्तरोत्तर यात कधी थोडी घट तर कधी थोडी वाढ झाल्याचे आढळले. २०१९ मध्ये सुमारे १ लाख ४८ हजार बालकांचा मुंबईत जन्म झाला होता.

२०२० मध्ये मात्र यात सर्वात मोठी म्हणजे ४२ हजारांनी घट झाल्याचे दिसून आले. परिणामी २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये जन्माला आलेल्या बालकांचे प्रमाण सुमारे २६ टक्क्यांनी घटले

आहे. २०२० मध्ये जन्मलेल्या बालकांमध्ये ५२ टक्के मुले तर ४८ टक्के मुलींचा समावेश आहे. २०१९ मध्ये मुलांचे प्रमाण ४७.२३ टक्के आणि मुलीचे ४४.२४ टक्के होते. यामुळे जन्मदरातही (दर एक हजार लोकसंख्येमागे) २०२० मध्ये गेल्या पाच वर्षांतील मोठी घट आहे.

सुरक्षित प्रसूतीचे महत्त्व…

मुंबईतही घरी प्रसूती होण्याची संख्या २०१५ मध्ये १,४६५ होती. उत्तरोत्तर यात घट होऊन २०१९ मध्ये ३५३ महिलांची प्रसूती घरी झाली. २०२० मध्ये यात आणखी घट झाली असून २५६ महिलांची घरी प्रसूती झाल्याचे आढळले आहे.

दरवर्षी मुंबईत साधारणपणे सुमारे दीड लाख बालकांचा जन्म होतो. टाळेबंदीमध्ये मोठ्या प्रमाणात कुटुंबे स्थलांतरित झाली. कामगार वर्ग त्यांच्या जिल्ह्यांमध्ये परतला. निर्बंध शिथिल झाल्यावर कामगार वर्ग मुंबईत परतला असला तरी त्यांची कुटुंबे मात्र आलेली नाहीत. यामुळे एकूणच प्रसूतींचे प्रमाण कमी झाले असून बालकांच्या जन्मसंख्येतही घट झाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona viurs birth rate result of the migration of families due to lockdown akp