scorecardresearch

लालबाग, परळमध्ये रुग्णवाढीचे विघ्न

मध्य मुंबईत गणेशोत्सवाच्या तोंडावर चिंता

लालबाग, परळमध्ये रुग्णवाढीचे विघ्न

मध्य मुंबईत गणेशोत्सवाच्या तोंडावर चिंता

मुंबई : गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या मध्य मुंबईत गेल्या आठवडय़ाभरापासून रुग्णवाढीचा आलेख वाढताना दिसत आहे. परळ, लालबाग, शिवडी, नायगाव, वडाळा हे भाग रुग्णवाढीत सगळ्यात वरच्या स्थानावर आहेत. गणेशोत्सवात गजबजणाऱ्या या भागात उत्सवापूर्वीच रुग्णवाढीचे विघ्न येऊन ठेपले आहे. मध्य मुंबईपाठोपाठ भायखळ्यातही रुग्णवाढ दिसत आहे.

एकीकडे गणेशोत्सवाच्या तयारीसाठी बाजारपेठा गर्दीने ओसंडून वाहत आहेत तर दुसरीकडे रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. शहरात निर्बंध शिथिल केल्यानंतर २० दिवसांतच दैनंदिन रुग्णसंख्येने जवळपास पाचशेचा आलेख पुन्हा गाठला आहे. मुंबईत रविवारी ४९६ रुग्णांचे नव्याने निदान झाले. १२ जुलैनंतर प्रथमच मुंबईत इतक्या मोठया संख्येने रुग्णसंख्या वाढल्याचे आढळले आहे.

गेल्या वर्षी गणेशोत्सवात नागरिकांनी जो संयम दाखवला तो यावर्षी दिसत नाही. लालबाग, परळ हा अस्सल मराठी लोकवस्तीचा भाग एरवीही गजबजलेला असतो.  पण प्रत्यक्षात गणेशोत्सव सुरू होण्याआधीच या भागात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे. अन्य मुंबईतील इतर भागांच्या तुलनेत येथे रुग्णवाढीचा दर जास्त आहे.

गेल्या आठवडय़ापासून भायखळ्याचा समावेश असलेला ई विभाग हा रुग्णवाढीत पहिल्या क्रमांकावर आहे. या भागात गेल्या आठवडय़ापासून दररोज पंधरा ते वीस नव्या रुग्णांची भर पडत आहे. मात्र गेल्या आठवडय़ात या भागातील एका अनाथाश्रमात एकाच दिवसात २२ रुग्ण आढळल्यामुळे हा दर वाढल्याचे मत सहाय्यक आयुक्त मनीष वळंजू यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर या भागात जे जे रुग्णालय असून तेथील कर्मचारी, आरोग्य सेवा देणारे कर्मचारी बाधित झाले की त्याची नोंद होत असल्यामुळे ही रुग्णवाढ दिसत असल्याचेही ते म्हणाले. तसेच या भागात फळांची व भाज्यांची व  विविध वस्तूंची मोठी बाजारपेठ असल्यामुळे खरेदीला येणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. त्यामुळेही रुग्ण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आम्ही चाचण्यांची संख्या वाढवली असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

 प्रमाण एक टक्क्यांवर

ऑगस्टच्या शेवटच्या आठवडय़ात मुंबईतील बाधितांचे प्रमाण ०.८६ टक्के होते. तर ३११२ रुग्ण उपचाराधीन होते. परंतु सप्टेंबरच्या पहिल्याच आठवडय़ात पुन्हा रुग्णसंख्येने उसळी घेतली आहे.बाधितांचे प्रमाण १.२१ टक्के झाले आहे. मुंबईत दहा दिवसांतच ३,८४३ रुग्णवाढ झाली.

गृहसंकुलांमध्येच संक्रमण जास्त

रुग्णसंख्या वाढली असली तरी मुंबईतील चाळी अजूनही करोनामुक्तच आहेत. गृह संकुलांमध्येच करोना संक्रमण वाढत असून सध्या मुंबईत ४४ इमारती प्रतिबंधित आहेत. मुंबईत चाळींमध्ये करोनाचे प्रमाण वाढल्यास विलगीकरणाची सुविधा उपलब्ध असावी यादृष्टीने सुमारे २५ हजारांची क्षमता असलेले करोना काळजी केंद्र तयार करण्याच्या सूचना विभागांना दिलेल्या आहेत. जेणेकरून बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना तातडीने येथे विलगीकरणासाठी पाठविता येईल, अशी माहिती काकाणी यांनी दिली.

पुढील एक महिना कसोटीचा

निर्बंध शिथिल करून आता १४ दिवस उलटून गेले त्यामुळे रुग्णसंख्या किचिंत वाढली आहे. परंतु आता पुढील एक महिना तरी कसोटीचा काळ असेल. गणेशोत्सवानंतर रुग्णसंख्या वेगाने न वाढल्यास मुंबईत संक्रमण पुन्हा वाढणार नाही, असे म्हणता येईल, असे मत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी व्यक्त केले.

रुग्ण दुपटीचा कालावधी

मुंबई                            १३६३  दिवस

परळ, लालबाग, शिवडी     ९०४

वडाळा, नायगाव              ८८३

रुग्णवाढीचा दर (टक्क्य़ांमध्ये)

मुंबई                              ०.०५

परळ, लालबाग, शिवडी     ०.०८ टक्के

वडाळा, नायगाव            ०.०८ टक्के

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या