मुंबई: मुंबईत शनिवारी करोनाच्या २४०२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १६४६ रुग्ण एका दिवसात बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत ८२ टक्के  रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

मुंबईत आतापर्यंत २,१२,३३६ व्यक्तींना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी १,७३,६७० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या २९,१९१ रुग्ण उपचाराधीन आहेत. मुंबईतील रुग्णवाढीचा दर हळूहळू कमी होत असला तरी दर दिवशी दोन हजाराच्या पुढे रुग्ण आढळत आहेत.  शनिवारी ४६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात ४० रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये ३० पुरुष व १६ महिला होत्या, तर ३८ जणांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक होते. आतापर्यंत ९०५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दर दिवशी १५ हजारापर्यंत चाचण्या होत आहेत.

देशात ६४ लाख ७३ हजार ५४४ रुग्ण

देशात गेल्या २४ तासांत ७९,४७६ लोकांना करोनाचा संसर्ग झाल्याने करोनाबाधितांची एकूण संख्या ६४ लाख ७३ हजार ५४४ इतकी झाली. याच कालावधीत १०६९ लोकांचा मृत्यू ओढवल्याने करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या १ लाख ८४२ इतकी झाली आहे.

एसटीच्या ६१ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

मुंबई: राज्यात आतापर्यंत ६१ एसटी कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. हे प्रमाण वाढतच असून गेल्या चार दिवसांत चार कर्मचारी करोनामुळे दगावले आहेत.

एसटी महामंडळाचे राज्यातील एकूण १ हजार ७९३ कर्मचारी, अधिकारी करोनाबाधित झाल्याची नोंद झाली आहे. यामध्ये ४४९ जणांवर उपचार सुरु असून १ हजार २८३ कर्मचारी उपचार घेऊन परतले आहेत. शनिवारी ३२ कर्मचारी करोनाबाधित झाल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. आतापर्यंत ६१ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. २९ सप्टेंबरला मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ५७ होती. करोनाबाधित कर्मचाऱ्यांची सर्वाधिक संख्या ही ठाणे विभागातील आहे. त्यापाठोपाठ मुंबई, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, नाशिक विभागातील कर्मचारी बाधित झाले आहेत.

ठाणे जिल्ह्यात  १,५५१ नवे रुग्ण

ठाणे : जिल्ह्यात शनिवारी १ हजार ५५१ नवे करोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यात करोनाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १ लाख ८० हजार ६९ वर पोहोचली आहे. तर, दिवसभरात ३२ जणांचा  मृत्यू झाला असून  मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ५५९ वर गेली आहे.