घरोघरी तपासणीसाठी पालिकेची १०६६ पथके कार्यरत; ‘करोना’बाबत जनजागृती करण्यावर भर

मुंबई : मुंबईत करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या किंवा परदेशातून प्रवास करून आलेल्या आणि लक्षणे दिसून न आलेल्या अशा ५२८ जणांना घरामध्येच वेगळे राहण्याच्या सूचना पालिकेने दिलेल्या आहेत. संशयित रुग्णांच्या घरी आणि सोसायटय़ांना भेट देऊन जनजागृती करण्यासाठी पालिकेची १०६७ पथके कार्यरत झाली आहेत.

शहरात मालाड पश्चिम भागात ६८ जणांना घरामध्ये वेगळे राहण्याची सूचना दिलेली  आहे. त्याखालोखाल बोरिवली (५९), अंधेरी (५६), कुर्ला (५१), घाटकोपर (४२), गोरेगाव (४१ ) यासह एकूण ५२८ जणांना घरामध्ये राहून काळजी घेण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. परदेशात प्रवास करून आलेल्या परंतु अद्याप कोणतीही लक्षणे न आढळलेल्या प्रवाशांची यादी केंद्र सरकारकडून पालिकेला दिली जाते. या यादीनुसार त्यांच्या घरी पालिकेचे कर्मचारी भेट देऊन त्यांची तपासणी करतात आणि त्यांना घरामध्येच वेगळे राहणे का गरजेचे आहे याांची माहिती दिली जाते. यात काही जणांनी परदेशी प्रवास केलेला नाही, मात्र करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेले आहेत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या उपाययोजना केल्या जात आहेत. शहरातील २४ विभागांमध्ये अशा २५४ घरांना पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भेट दिलेली आहे.

शहरात निर्माण झालेले असुरक्षिततेचे वातावरण दूर करण्यासाठी आणि लोकांमधील या आजाराबाबतच्या शंका दूर करण्यासाठी प्रत्येक विभागामध्ये पालिकेचे कर्मचारी सोसायटीमध्ये जाऊन जनजागृती करत आहेत. रविवापर्यंत १० हजार २७ सोसायटय़ांना या कर्मचाऱ्यांनी भेट दिली आहे. घरामध्ये वेगळे ठेवलेल्यांच्या सोसायटीमध्येही पालिकेचे कर्मचारी जाऊन जनजागृती करत आहेत. या कुटुंबांना आधार देण्याचे आवाहनही केले जात आहे.

गृहअलगीकरणात काय काळजी घ्यावी?

* घरामध्ये हवा खेळती असेल अशा खोलीत या व्यक्तीने राहावे. दुसऱ्या व्यक्तीपासून किमान १ मीटर अंतर ठेवावे.

* त्या व्यक्तीने वापरावयाच्या वस्तू ताट, ग्लास, कप, अंथरुण-पांघरूण, रुमाल, टॉवेल इत्यादी स्वतंत्र असाव्यात.

* घरातील सर्व व्यक्तींनी उपलब्ध असल्यास सर्जिकल मास्कचा वापर करावा.  दर सहा ते आठ तासांनी मास्क बदलणे गरजेचे आहे.

* वापरलेले मास्क ब्लिचिंग पावडर किंवा हायपोक्लोराईटने र्निजतुकीकरण करून पेपरमध्ये बांधून त्याची विल्हेवाट लावावी.

*  शंका असल्यास १९१६ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा.