Coronavirus : मुंबईत दिवसभरात ५८६ रुग्ण; ११ जणांचा मृत्यू

रुग्णदुपटीचा कालावधी ३५४ दिवसांवर गेला आहे.

ठाणे महापालिकेच्या ‘मिशन झिरो’ अभियानांतर्गत रविवारी शहरात विविध ठिकाणी नागरिकांची करोना चाचणी करण्यात आली. (छाया- दीपक जोशी)

मुंबई : मुंबईत रविवारी ५८६ करोनाबाधित आढळले, तर ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ९३ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. रुग्णवाढीचा दर ०.२१ टक्क्यावर स्थिर आहे.

मुंबईतील रुग्णसंख्या वाढीचा वेग कमी झाला आहे. दररोज सातशे ते आठशेच्या आत रुग्ण आढळत असून, एकूण रुग्णसंख्या २ लाख ८६ हजाराच्या पुढे गेली. रविवारी दिवसभरात २९८ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत २ लाख ६७ हजार म्हणजेच ९३ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या ७ हजार ९९६ रुग्ण उपचाराधीन आहेत.

रुग्णदुपटीचा कालावधी ३५४ दिवसांवर गेला आहे. आतापर्यंत मुंबईत २१ लाख ९३ हजार चाचण्या करण्यात आल्या.

राज्यात ३,८११ नवे रुग्ण

राज्यात गेल्या २४ तासांत ३,८११ करोना रुग्णांची नोंद झाली असून, ९८ जणांचा मृत्यू झाला. एकूण बाधितांची संख्या १९ लाखांच्या जवळ आली असून, ४८,७४६ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला.

मुंबईतील ५५ हजारांहून अधिक इमारती टाळेमुक्त

मुंबई : एकीकडे मुंबईतील करोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे निर्बंध हटवून तब्बल ५५ हजारांहून अधिक इमारती टाळेमुक्त करण्यात आल्या आहेत. करोनाबाधित रुग्ण सापडल्याने आजघडीला केवळ ३,४९१ इमारती टाळेबंद आहेत. तर अवघ्या २६० झोपडय़ा आणि चाळींवर निर्बंध आहेत.

दोनपेक्षा अधिक मजल्यावर रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत अथवा बाधित रुग्णाचे वास्तव्य असलेला मजला टाळेबंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे आदेश विभाग कार्यालयांतील साहाय्यक आयुक्तांना देण्यात आले. आतापर्यंत मुंबईतील ५८ हजार ९४८ इमारती टाळेबंद कराव्या लागल्या होता. मात्र विलगीकरणाचा काळ पूर्ण झाल्यामुळे, तसेच नवे रुग्ण आढळून न आल्याने तब्बल ५५ हजार ४५७ इमारती टाळेमुक्त करण्यात आल्या. आजघडीला केवळ तीन हजार ४९१ इमारती टाळेबंद आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात ४०३ नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्य़ात रविवारी ४०३ रुग्ण आढळले, तर सात जणांचा मृत्यू झाला. एकूण रुग्णसंख्या २ लाख ३८ हजार ९३१, तर करोनाबळींची संख्या ५ हजार ८७८ इतकी झाली आहे. रविवारी ठाणे पालिका क्षेत्रात १०५, कल्याण डोंबिवली १०३, नवी मुंबई ८८, मीरा भाईंदर ३१, बदलापूर ३१, ठाणे ग्रामीण २०, अंबरनाथमध्ये १२ रुग्ण आढळले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Coronavirus in mumbai mumbai records 586 new covid 19 cases zws

ताज्या बातम्या