|| अमर सदाशिव शैला

करोनाच्या संसर्गभयाचा परिणाम; राज्यभर सारखीच स्थिती

मुंबई : अंथरूणाला खिळून असलेल्या अथवा स्वत:ची कामे करू न शकणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी नर्सिंग होम आणि केअर सेंटरची (काळजीकेंद्र) मागणी वाढू लागली आहे. मात्र राज्यातील अनेक केअर सेंटर्समध्ये ज्येष्ठांना सामावून घेण्याची क्षमता संपुष्टात आली आहे, तर काहींनी करोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीने गेल्या वर्षीपासून प्रवेश बंद केला आहे. त्यातून ज्येष्ठांच्या अडचणीत भरच पडली आहे.

पुण्यातील मधुरभाव सीनिअर लिव्हिंग होमच्या डॉ. अंजली देशपांडे म्हणाल्या, ‘‘अनेक ज्येष्ठांचे नातलग परदेशात आहेत व त्यांची काळजी घेण्यासाठी इथे कुणीच नाही. त्यामुळे त्यांना काळजी केंद्रात  पाठवले जाते. तसेच घरात कुटुंबीय असले तरी सध्या वर्क फ्रॉम होममुळे ज्येष्ठांच्या सर्व गोष्टी संभाळणे कुटुंबीयांना शक्य होत नाही. तर अनेक घरांत संवाद खुंटल्यामुळेही ज्येष्ठांची पैसे देऊन दुसरीकडे सोय करण्याची मानसिकता वाढली आहे. सध्या आमचे केअर सेंटर पूर्ण भरले असून सध्या ५५ ज्येष्ठ मंडळी राहात आहेत. हीच संख्या करोनाआधी ४५ होती. यातील अनेक जणांकडे करोनाआधी घरात मदतनीस होते व करोनाची लागण होण्याच्या भीतीने या ज्येष्ठांना सेंटरमध्ये भरती करण्यात आले. दर दिवशी ५ ते ६ जणांकडून जागेबाबत विचारणा होते आणि सध्या १५ ते २० ज्येष्ठ नागरिक भरती होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ज्येष्ठांकडून वाढणारी मागणी पाहून संस्थेने राहाण्याची क्षमता वाढवली, मात्र हे केंद्र सुरू होण्यापूर्वीच त्याची नोंदणी पूर्ण झाली आहे.’’

करोनातून बरे झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना घरी घेऊन जाण्याऐवजी त्यांना सेंटरमध्ये आणण्याकडेही कल वाढला असून गेल्या ३-४ महिन्यांत करोनातून बरे झालेल्या ६ ज्येष्ठांना सेंटरमध्ये भरती करण्यात आले, असेही देशपांडे यांनी सांगितले. घरात लहान मुले असल्याने वा नातलग परदेशात असल्याने ज्येष्ठांना या सेंटरमध्ये भरती केल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे असून पुढील ३-४ महिन्यांनी धोका टळल्यावर त्यांना घरी घेऊन जाऊ, असे कुटुंबीय सांगत असल्याचे त्या म्हणाल्या.

‘करोनाच्या साथीत २४ तास काम करणाऱ्या मदतनीसांची मागणी अधिक आहे. ८ तास किंवा १२ तास सेवा देणाऱ्या सुमारे ७० टक्के जणांचा रोजगार या काळात गेला. सेवेकऱ्यांना अनेकदा लोकलमध्ये प्रवेश दिला जात नाही. त्यातूनही त्यांना कामावर पोहोचणे अवघड होते, असे ‘मुक्ताई हेल्थकेअर २४’चे व्यवस्थापकीय संचालक संदीप राठोड यांनी सांगितले.

करोनाआधी सेंटरमध्ये भरती होण्यासाठी दरदिवशी एखाद्या व्यक्तीकडून चौकशी होत असे. आता दरदिवशी ५ ते ७ लोक चौकशी करतात. मात्र आमच्या नियमांमध्ये अनेकजण बसत नसल्याने त्यांना घेणे शक्य होत नाही, असे ‘बालाजी हेल्थकेअर’च्या डॉ. महालक्ष्मी अय्यर यांनी सांगितले.

कारण काय?

गेल्या वर्षी टाळेबंदी लागू झाल्यावर एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ करणारे मदतनीस वाहतुकीच्या साधनांअभावी येणे बंद झाले. करोनाची लागण होण्याची भीती निर्माण झाल्याने अनेक कुटुंबीयांनी त्यांना बोलावणे थांबवले. ज्येष्ठांसाठी २४ तास सेवा देणाऱ्या मदतनीसांची मागणी या काळात वाढली. यातून ज्येष्ठांना निवासी सुविधा देणाऱ्या संस्थांकडे अधिक प्रमाणात विचारणा होऊ लागली.

 

धोरण हवे…

‘नर्सिंग केअर’साठी राज्यात विशेष धोरण नाही. सरकारने ते धोरण बनवावे. असे धोरण बनवल्यास नर्सिंग होमला योग्य पद्धतीने काम करता येईल आणि त्याचबरोबर काही केंद्रांकडून होणारी आर्थिक लूटही थांबेल. वृद्धाश्रमात ‘हेल्थकेअर’ सेवा सुरू केली, तरीही ज्येष्ठांना मदत होईल,’ असे ‘सिल्व्हर इनिंग’ संस्थेचे शैलेश मिश्रा यांनी सांगितले.

‘  नर्सिंग होम आणि रुग्णालयात करोनाकाळात बरेच निर्बंध होते. अनेक ठिकाणी खाटा भरल्या होत्या. त्यामुळे प्रवेशासाठी वाट पाहावी लागत होती. या कारणांमुळे ज्येष्ठांना उपचार आणि सुविधा मिळण्यात उशीर झाला,’ -प्रकाश बोरगावकर, ‘हेल्पेज इंडिया’- महाराष्ट्र आणि गोवा विभाग प्रमुख