देशात दिवसभरात फक्त २५.१४ लाख मात्रा; तुटवड्यामुळे मुंबईत आज मोहीम ठप्प

मुंबई / नवी दिल्ली : देशात दहा दिवसांपूर्वी विक्रमी लसीकरणाची नोंद करणारी मोहीम आता मात्र संथगतीने सुरू आहे. देशभरात बुधवारी केवळ २५.१४ लाख नागरिकांचे लसीकरण झाले. दुसरीकडे, लससाठाच उपलब्ध नसल्याने मुंबईसह काही जिल्ह्यांत आज, गुरुवारी शासकीय केंद्रांवरील लसीकरण बंद ठेवण्यात येणार आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार देशात बुधवारी २५.१४ लाख नागरिकांचे लसीकरण झाले. त्यातील १८-४४ वयोगटातील पहिली मात्रा घेणाऱ्या १३,४३,२३१ जणांचा समावेश आहे. देशात आतापर्यंत ३३,५४,६९,३४० लसमात्रा देण्यात आल्या आहेत.

लशींचा तुटवडा असल्याने देशभरात मोहीम मंदावली आहे. महाराष्ट्रात लशींचा खडखडाट आहे. मुंबईसह काही जिल्ह्यांतील लससाठा बुधवारी संपला. त्यामुळे गुरुवारी तेथील लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. साठा प्राप्त झाल्यावर लसीकरण सुरू केले जाईल, अशी माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

राज्यात साठा असलेल्या ठिकाणी गुरुवारी लसीकरण सुरू राहील. राज्यात बुधवारी सुमारे पावणेदोन लाख लशींच्या मात्रांचे वितरण करण्यात आले. गुरुवारी सकाळी सुमारे नऊ लाख लशींच्या मात्रा प्राप्त होणार आहेत. त्यांचे वितरण गुरुवारीच केले जाईल, असे आरोग्य आयुक्तालयाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले. त्यामुळे शुक्रवारी लसीकरण मोहीम पूर्ववत होईल, अशी आशा आहे.