मुंबई : देशभरात झालेल्या १०० कोटी लसीकरणापैकी राज्यातील साडेनऊ कोटी लसमात्रांचा समावेश आहे. लसमात्रांच्या संख्येत उत्तर प्रदेश आघाडीवर असले तरी दोन्ही लसमात्रांच्या लाभार्थ्यांमध्ये महाराष्ट्र अग्रस्थानी आहे.

 महाराष्ट्रात ७० टक्के  म्हणजे ६ कोटी ४० लाख नागरिकांना पहिली लसमात्रा देण्यात आली आहे. दोन्ही लसमात्रा घेतलेल्यांची संख्या २ कोटी ९० लाख आहे. हे प्रमाण ३५ टक्के  असल्याचे  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. सध्या लशींची अजिबात कमतरता नाही. राज्याच्या मागणीनुसार केंद्र सरकारकडून लशीचा पुरवठा केला जात आहे, असे सांगत राजेश टोपे यांनी याबद्दल केंद्राचे आभार मानले.

महाराष्ट्रात सध्या दीड लाख व्यक्तींची प्रतिदिन करोना चाचणी केली जाते. त्यापैकी बाधितांचे प्रमाण एक टक्का आढळते. करोनाची

दुसरी लाट शिखरावर असताना हे प्रमाण सहा ते सात टक्क्यांहून अधिक होते, याकडे लक्ष वेधत टोपे यांनी दुसरी लाट ओसरत असल्याचे  सांगितले.