धारावीत करोनाचा फैलाव कमी कऱण्यासाठी राज्य सरकार तसंच महापालिकेने केलेल्या कामाची केंद्र सरकारने दखल घेतली असून कौतुक केलं आहे. करोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झालेल्या धारावीत परिस्थिती नियंत्रणात असून राज्य सरकार आणि महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात मोहीम चालवण्यात आली. या मोहिमेला यश मिळालं असून धारावीत करोनाची परिस्थिती नियंत्रणात आली आहे. केंद्र सरकारने याची दखल घेत राज्य सरकार आणि महापालिकेच्या पाठीवर कौतुकाचीच थाप दिली आहे.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावीत घनदाट वस्ती असल्याने करोनाचा फैलाव रोखण्याचं मोठं आव्हान राज्य सरकारसमोर होतं. पण महापालिकेने योग्य पाऊलं उचलल्याने मे महिन्यात ४.३ टक्के असणारी रुग्णवाढ जून महिन्यात १.२ टक्क्यांवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयानेही मुंबई महापालिकेचं कौतुक केलं आहे. मे महिन्यात सरासरी ४२ असणारी रुग्णसंख्या जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात १९ वर आली आहे.

आणखी वाचा- सेंट जॉर्जमधील अंध करोना योद्धा राजू चव्हाणचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

एप्रिल महिन्यात धारावीत ४९१ करोना रुग्ण होते. यावेळी डबलिंग रेट १८ दिवसांचा होता. पण राज्य सरकार आणि महापालिकेने योग्य ती पाऊलं उचलत मोहीम राबवली आणि डबलिंग रेट मे महिन्यात ४३ दिवसांवर आणला. तर जूनमध्ये डबलिंग रेट ७८ दिवसांचा झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

याआधी इतर राज्यांनी अशा पद्धतीने धोरण आखून चांगले निकाल दिले आहेत असं सांगत केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकार आणि महापालिकेने महत्त्वाची कामगिरी केली असल्याचं म्हटलं आहे. “धोरण राबवताना महाराष्ट्र सरकारने आक्रमकपणे काम केलं आणि करोना संशयितांच्या चाचण्या केल्या,” असं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

आणखी वाचा- मुंबई महापालिकेचे “मिशन झिरो..”; उपनगरांमध्ये मोबाइल व्हॅनद्वारे होणार करोनाची पूर्वतपासणी

राज्य सरकार आणि पालिकेसमोर असणाऱ्या आव्हानांचा उल्लेख करताना आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, “धारावीतील ८० टक्के लोक सार्वजनिक शौचलायाचा वापर करतात. एका घरात जवळपास आठ ते दहा लोक राहतात. याशिवाय छोट्या गल्ल्या, दोन ते तीन मजल्यांची घरं आहेत. यामधील अनेक ठिकाणी तळ मजल्यांवर फॅक्टरी आहेत. यामुळे येथे सोशल डिस्टन्सिंग पाळणं शक्य नसून होम क्वांरटाइनचीही मोठी समस्या आहे. पण राज्य सरकारने ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग हा मंत्र वापरला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली”.