देशामधील करोनाग्रस्तांची संख्या ६०० हून अधिक झाली आहे. तर महाराष्ट्रात ही संख्या १२४ वर पोहचली आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलली असून मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशामध्ये पुढील २१ दिवस लॉकडाउन राहिलं अशी घोषणा केली आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात येतील मात्र सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये असं आवाहन सरकारी यंत्रणांमार्फत केलं जात आहे. असं असताना अनेकजण जिवनावश्यक वस्तू तसेच इतर कारणांसाठी घराबाहेर पडून गर्दी करताना दिसत आहे. पोलिसांनी आता कारण नसताना बाहेर पडणाऱ्यांना चोप देण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे पोलीस रस्त्यावर कारवाई करत असताना दुसरीकडे पोलिसांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांना बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. मात्र नेटकऱ्यांना त्यांच्या हटके भाषेत समजवण्यासाठी मुंबई पोलिसांनीही अगदी भन्नाट कल्पना लडवली असून त्यांनी बारा राशींचे आगळेवेगळे भविष्यच ट्विट केलं आहे.

राज्यामध्ये तीन दिवसापूर्वीच संचारबंदी लागू करण्यात आली असून जागोजागी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. कारण नसताना घराबाहेर पडणाऱ्यांचा पोलिसांकडून समाचार घेतला जात आहेत. तर दुसरीकडे सोशल नेटवर्किंगवरही पोलिसांकडून राज्यामधील स्थितीची माहिती पुरवली जात आहे. यामध्ये अगदी अफवा पसरवू नका इथपासून ते कोणत्या दुकानांवर काय कारवाई करण्यात आलीपर्यंतचे अनेक अपडेट्स पोलीस खात्याकडून फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल मिडियाच्या माध्यमातून सामान्यांपर्यंत पोहचवले जातं आहेत. अशाच मुंबई पोलिसांनी केलेलं एक ट्विट चांगलचं चर्चेत आहे.

नक्की वाचा >> Coronavirus: पोलिसांकडून Whatsapp Admins साठी महत्वाची सूचना, म्हणाले ‘ही’ सेटींग बदला 

तुमचे या आठवड्याचे भविष्य असा फोटो मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आला आहे.यामध्ये सर्व बारा राशींचे भविष्य देण्यात आलं आहे. तसेच या फोटोला कॅप्शन देताना पोलिसांनी, “एकदा केवळ एकदा तुम्ही तुमच्या राशी संदर्भात वर्तवण्यात आलेल्या भविष्यावर विश्वास ठेऊन सांगितल्याप्रमाणे वागलात तर ग्रह-तारेही नक्कीच तुमची साथ देतील” असं म्हटलं आहे. मजेदार बाब म्हणजे सर्व बारा राशींचे भविष्य ‘तुम्ही तुमचा वेळ घरात घालवाल,’ असं लिहिण्यात आलं आहे. म्हणजेच पुढील काही दिवस घरातच थांबणार आहात किंवा तसं नसाल करणार तर तसं करा असंच पोलिसांना या ट्विटमधून सांगायचं आहे.

मुंबई पोलिसांच्या या ट्विटला तीन हजारहून अधिक जणांनी रिट्विट केलं आहे. काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर पोलिसांच्या औपचारिक ट्विटर हॅण्डलवरुन व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमीन्स काय खबरदारी घ्यावी यासंदर्भात एक ट्विट करण्यात आलं आहे. “सर्व ग्रुप अ‍ॅडमीनने नोंद घ्या, की व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवरून अफवा पसरविल्या जात आहेत. तरी सर्व ग्रुप अ‍ॅडमीनने आपल्या ग्रुपच्या सेटिंगमध्ये जाऊन Only Admin अशी सेटिंग करून घ्यावी,” असं पोलिसांनी या ट्विटमध्ये म्हटलं होतं.