गणरायाला निरोप देण्यासाठी पालिका सज्ज

अनंत चतुर्दशीनिमित्त होणाऱ्या गणेश विसर्जनाची जय्यत तयारी महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.

गिरगाव चौपाटी येथील विसर्जनस्थळी महापालिकेने जय्यत तयारी केली असून विसर्जन सुलभ व्हावे यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत.

विसर्जनस्थळी निर्माल्य कलश, प्रकाशझोत, जीवरक्षक, नियंत्रण कक्ष यांसह विविध सुविधा

मुंबई : अनंत चतुर्दशीनिमित्त होणाऱ्या गणेश विसर्जनाची जय्यत तयारी महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. रविवारी मोठय़ा संख्येने घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन होणार असल्याने पालिके ची यंत्रणा सज्ज झाली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून यंदाही १७३ ठिकाणी कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात आली असून आवश्यकतेनुसार विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे, फिरती विसर्जन स्थळे कार्यरत असणार आहेत. तसेच संपूर्ण मुंबईत २५ हजार  कामगार, कर्मचारी, अधिकारी विविध ठिकाणी उपस्थित असतील.

गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाच्या गणेशोत्सवावरही करोनाचे सावट होते. या पार्श्वभूमीवर पालिके ने विशेष तयारी के ली आहे. विसर्जन करताना होणारी गर्दी टाळण्यासाठी यंदाही पालिकेने १७३ ठिकाणी कृत्रिम तलावांची उभारणी के ली आहे. तसेच ७३ ठिकाणी नैसर्गिक विसर्जनस्थळे असून, या ठिकाणी महापालिकेद्वारे आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त आणि गणेशोत्सव समन्वयक हर्षद काळे यांनी दिली.

चौपाटय़ांसह विविध नैसर्गिक व कृत्रिम विसर्जनस्थळी ७१५ जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी येणारे वाहन समुद्र किनाऱ्यावरील भुसभुशीत रेतीमध्ये अडकू नयेत यासाठी नैसर्गिक विसर्जनस्थळी ५८७ ‘स्टील प्लेट’ची व्यवस्था करून तात्पुरते वाहन मार्ग तयार करण्यात आले आहेत. याचबरोबर ३३८ निर्माल्य कलश, १८२ निर्माल्य वाहन, १८५ नियंत्रण कक्ष, १४४ प्राथमिक उपचार केंद्र, ३९ रुग्णवाहिका इत्यादींची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त १४५ स्वागतकक्ष, ८४ तात्पुरती शौचालये, ३ हजार ७०७ फ्लड लाइट, ११६ सर्च लाइट, ४८ निरीक्षण मनोरे आणि नैसर्गिक विसर्जनस्थळांच्या ठिकाणी ३६ मोटर बोट व ३० जर्मन तराफा इत्यादी सुविधा व साधनसामग्रींचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विविध ठिकाणी सरंक्षण कठडय़ांच्या व्यवस्थेसह विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे.

सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन

सात दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन गुरुवार, १६ सप्टेंबरला पार पडले. शुक्रवारी पहाटेपर्यंत एकू ण १५ हजारांहून अधिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये सार्वजनिक १३५६ तर घरगुती १३,७२६ तसेच गौरी २१३ मूर्ती होत्या. त्यापैकी सार्वजनिक ६७१, घरगुती ६०९२ व ५५ गौरी अशा एकू ण ६८१८ मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावांत करण्यात आले.

भाविकांना सूचना

  • सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी हार/ फुले यांचा कमीतकमी वापर करून कमी निर्माल्य तयार होईल याची दक्षता घ्यावी.
  • घरगुती गणेशाची मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्याघरी बादलीत किंवा ड्रममध्ये करावे.
  • गणेशमूर्तीचे विसर्जन घरच्याघरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे.
  • सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही नजीकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी मूर्तीचे विसर्जन करण्यास प्राधान्य द्यावे.
  • विसर्जनाच्या वेळी मिरवणुकीने जाऊ नये, विसर्जनासाठी जास्तीत जास्त ५ व्यक्ती असाव्यात. शक्यतो या व्यक्तींनी लसीकरणच्या दोन मात्रा घेतलेल्या असावेत आणि दुसरी मात्रा घेऊन १५ दिवस झालेले असावेत.
  • घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करताना संपूर्ण चाळीतील / इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी एकत्रितरित्या नेऊ नयेत.
  • विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीतकमी वेळ थांबावे.
  • शक्यतो लहान मुले व वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाऊ नये.
  • सार्वजनिक गणशोत्सव मंडळांनी मंडपापासून विसर्जन स्थळापर्यंत मूर्ती असलेले वाहन मिरवणुकीसारखे अत्यंत धीम्या गतीने नेऊ नये, तर वाहनातील गणेशमूर्तीला इजा पोहोचणार नाही अशा सामान्य गतीने वाहन विसर्जन स्थळी घेऊन जावे. विसर्जना दरम्यान वाहन थांबवून रस्त्यांवर भाविकांना गणेशमूर्तीचे दर्शन घेऊ देण्यास/पूजा करुन देण्यास सक्त मनाई आहे.
  • प्रतिबंधित क्षेत्रात असणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन मंडपातच करावयाचे आहे किंवा विसर्जन पुढे ढकलायचे आहे, तर प्रतिबंधित इमारतींमधील गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी घरीच व्यवस्था करायची आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corporation ready bid farewell ganesh festival ssh

ताज्या बातम्या