विशेष निधी स्थानांतरित करण्यासाठी स्थायी समितीकडे प्रस्ताव

मुंबई :  निवडणूक जवळ आल्यामुळे नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात निधीचा वापर करण्यासाठी घाई सुरू केली आहे. विकासनिधीचा जास्तीत जास्त वापर करून प्रभागात अधिकाधिक विकासकामे करून त्याआधारे मतदार राजाला आकर्षित करण्यासाठी नगरसेवकांची धावपळ सुरू झाली आहे. वापर न झालेला विशेष निधी विकासकामांसाठी वळवण्याचा मार्ग नगरसेवकांनी अवलंबवला असून तीन नगरसेवकांचा विशेष निधी स्थानांतरित करण्याकरिता स्थायी समितीकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

फेब्रुवारी २०२२ मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक अपेक्षित असून नगरसेवकांनी आपल्या विकासनिधीचा पुरेपूर वापर करण्यासाठी घाई सुरू केली आहे. महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर होताना नगरसेवक त्यात त्यांच्या प्रभागातील विविध कामांसाठी आर्थिक तरतूद करून घेतात. अनेक नगरसेवकांना स्थायी समितीकडून विशेष निधी मिळतो. तो निधी वापरून विशेष कामेही प्रभागात करवून घेतली जातात. कधीकधी तांत्रिक कारणामुळे हा  निधी पडून राहतो किंवा पूर्ण निधी वापरला गेला नाही तर तो वाया जातो. मात्र फेब्रुवारीत निवडणूक असल्यामुळे हा निधी वाया जाऊ न देता त्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी नगरसेवकांची धडपड सुरू झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांनी त्यांच्या विभागातील खर्च न झालेला निधी इतर कामांसाठी वळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी प्रशासनाबरोबर रीतसर पत्रव्यवहारही सुरू केला आहे. गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाने तीन नगरसेवकांचा विशेष निधी स्थानांतर करण्यासाठी प्रस्ताव मांडले आहेत. नगरसेवकांनी स्थायी समितीकडून विशेष निधी मिळवला होता. मात्र काही नगरसेवकांचा हा निधी वाया जाण्याची शक्यता असल्यामुळे तो त्या त्या प्रभागातील विकासकामांकडे वळवण्यात येणार आहे.

या नगरसेवकांकडून निधी वळवण्याचा प्रस्ताव

  • बोरिवली येथील प्रभाग क्रमांक ९ मधील काँग्रेसच्या नगरसेविका श्वेता कोरगावकर-परब यांनी स्मशानभूमी आणि प्रसूतिगृहासाठी १ कोटी रुपयांची तरतूद केली होती. तांत्रिक कारणाने ही तरतूद वापरता येत नसल्याने हा निधी स्थानिक रहिवाशांसाठी मूलभूत सुविधांसाठी वळविण्यात येणार आहे.
  • प्रतीक्षानगर येथील १७३ प्रभागात शिवसेना नगरसेवक रामदास कांबळे यांनी शालेय विद्यार्थ्यांना टॅब वाटपासाठी केलेल्या ५५ लाख रुपयांच्या तरतुदींपैकी २० लाख रुपयांची तरतूद प्रभागातील पायाभूत सुविधांसाठी वळविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडला आहे. शिलाई मशीन, ज्यूटच्या पिशव्यांसाठी तरतूद करण्यात आलेल्या ५५ लाखांपैकी २० लाख रुपयांचा निधी पायाभूत सुविधांसाठी वळविण्यात येणार आहे.
  •   प्रतीक्षानगर येथील प्रभाग क्रमांक १७५ मध्ये शिवसेना नगरसेवक मंगेश सातमकर यांनी त्यांच्या प्रभागासाठी केलेल्या दोन कोटी २५ लाख रुपयांच्या तरतुदीपैकी एक कोटी रुपयांचा निधी वळविण्यात येत आहे. हा निधी  पायाभूत सुविधांसाठी वळविण्याचे प्रस्तावित आहे.