मुंबई : महानगरपालिका मुख्यालयात सभागृहासह अन्य समित्यांच्या बैठकीसाठी खासगी वाहनातून आलेल्या अनेक नगरसेवकांच्या गाड्यांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. नगरसेवकांच्या गाड्यांसाठी पुरेशी जागाच नसल्याने पर्यायी जागेचा शोध घ्यावा, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे. दरम्यान, क्रीडा संकुलाच्या जागेवर तीन मजली इमारत बांधून त्या ठिकाणी महापालिका सभागृह, वाहनतळ आदींची सोय करण्याची मागणी नगरसेवकांनी केली असली तरीही ते काम पूर्ण होण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे ही समस्या नेमकी कशी सोडवावी, असा प्रश्न महापालिका प्रशासनासमोर ठाकला आहे.
महापालिका सभागृहात गेल्या २-३ दिवसांपासून अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असून त्यानिमित्ताने नगरसेवक महापालिका मुख्यालयात येत आहेत. महापालिकेतील ६० ते ७० टक्के नगरसेवक खासगी वाहनांचा वापर करतात. सभेसाठी येणारे बहुतांश नगरसेवक मुख्यालयासमोरील जागेत शक्य होईल तिथे गाड्या उभ्या करतात. दरम्यान, या प्रकारामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याची बाब लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत महापालिकेच्या परिसरातील जवळपास १०० वाहनांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. परिणामी, वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याबाबत अनेक नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. गुरुवार व शुक्रवारी वाहतूक पोलिसांनी वाहनांची छायाचित्रे टिपल्याबद्दल नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. महापालिका इमारतीच्या आसपास कुठेही मोकळी जागा नसते. शिवाय, नगरसेवक महिन्यातून काहीच दिवस महापालिकेत येतात. तेही सामान्य नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी. त्यामुळे त्यांच्या गाड्यांवर कारवाई करू नये, अशी मागणी नगरसेवकांनी केली.
धोरण नसल्याबद्दल खंत
महापालिका मुख्यालयाच्या आसपासचे रस्ते महापालिकेकडेच असल्यामुळे महापालिका सभागृहाच्या बैठकीच्या दिवशी ते नगरसेवकांच्या गाड्या उभ्या करण्यासाठी राखीव ठेवावेत, अशी मागणी शिवसेनेचे (ठाकरे) नगरसेवक सचिन पडवळ यांनी केली. तसेच, सत्ताधाऱ्यांनी गाड्या उभ्या करण्याबाबतचा प्रश्न सोडवावा. बाहेरच्या गाड्यांवर निर्बंध आणावेत, असे विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या. महापालिकेतील नगरसेवकांच्या गाड्यांनाच वाहनतळ उपलब्ध होत नसेल, तर सामान्य नागरिकांना महापालिका प्रशासन काय सुविधा देणार, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. मुळात प्रशासनाकडे वाहनतळाबाबतचे धोरणच नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
नियमांच्या उल्लंघनामुळे कारवाई
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे वाहनांवर कारवाई करण्यात आली. ती वाहने नगरसेवकांची आहेत की खासगी, याकडे पाहिले नाही, असे मुंबई वाहतूक शाखेचे सह पोलीस आयुक्त अनिल कुंभारे स्पष्ट केले. तसेच, नागरिकांनी अधिकाधिक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
आझाद मैदानात वाहने उभी करण्यासाठी चर्चा
जोपर्यंत क्रीडा संकुलाच्या जागेवर नवीन सभागृह उभारण्यात येत नाही, तोपर्यंत ही समस्या सोडविणे कठीण आहे. नगरसेवक महिन्यातून केवळ चार वेळा महापालिकेत येतात. त्यामुळे अशा पद्धतीने कारवाई करणे चुकीचे आहे. दरम्यान, महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदानात तात्पुरत्या स्वरूपात नगरसेवकांच्या गाड्या उभ्या करण्याबाबत वाहतूक पोलिसांशी चर्चा झाली आहे. त्याबाबत ते सकारात्मक आहेत. – गणेश खणकर, सभागृह नेते
