मुंबई : दक्षिण मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींच्या पावसाळापूर्व सर्वेक्षणात यंदा तब्बल ९६ इमारती अतिधोकादायक ठरल्या आहेत. तर या इमारतींतील सुमारे २४०० रहिवाशांच्या तात्पुरत्या स्थलांतराचे आव्हान म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळासमोर आहे. असे असताना दुरुस्ती मंडळाकडे संक्रमण शिबिराचे पुरेसे गाळेच नसल्याने हे आव्हान आणखी कठीण झाले आहे. त्यामुळे आता दुरुस्ती मंडळाने ९६ अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना संक्रमण शिबिराच्या गाळ्याच्या बदल्यात दरमहा २० हजार रुपये घरभाडे देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या रहिवाशांना भाडेतत्वावरील घरे सहज उपलब्ध व्हावीत यासाठी ४०० घरे भाडेतत्वावर घेण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यानुसार ही घरे भाडेतत्वावर घेण्यासाठी लवकरच मंडळाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
जुन्या-मोडकळीस आलेल्या इमारती पावसाळ्यात कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी दरवर्षी मंडळाकडून पावसाळ्यापूर्वी उपकरप्राप्त इमारतींचे सर्वेक्षण करून अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात येते. त्यानंतर या इमारतीतील रहिवाशांना संक्रम शिबिरात स्थलांतरित करून इमारती रिकाम्या करुन घेतल्या जातात. त्यानुसार यंदा पहिल्यांदाच ९६ इमारती अतिधोकादायक ठरल्या आहेत. ही संख्या आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे, तर यंदा तब्बल २४०० रहिवाशांच्या तात्पुरत्या स्थलांतराचे आव्हान मंडळासमोर आहे. अशा वेळी मंडळाकडे ७८६ गाळे उपलब्ध आहेत. त्यामुळे रहिवाशांच्या स्थलांतराचा प्रश्न आणखी गंभीर बनला आहे. त्यामुळेच आता हे आव्हान पेलण्यासाठी मंडळाने उर्वरित रहिवाशांच्या स्थलांतरासाठी त्यांना दरमहा २० हजार रुपये घरभाडे देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती म्हाडाकडून देण्यात आली.
रहिवाशांना भाड्याची घरे सहजरित्या उपलब्ध व्हावीत यासाठीही म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बाह्य यंत्रणांच्या माध्यमातून तीन वर्षांसाठी १८० ते २५० चौरस फुटांचे ४०० गाळे रहिवाशांसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाळ्यांच्या उपलब्धतेसाठी शक्य तितक्या लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्याचे निर्देश जयस्वाल यांनी दुरुस्ती मंडळाला दिले आहेत. मुंबईत पावसाला सुरुवात झाली असून अतिधोकादायक इमारती कोसळण्याची भिती आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकरच अतिधोकादायक इमारती रिकाम्या करुन घेणे आवश्यक आहे. परिणामी, घरभाड्याच्या आणि भाड्याने घरे देण्याच्या निर्णयाची तातडीने दुरुस्ती मंडळाकडून अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे.