बांधकामाला संरक्षण मिळावे म्हणून दीड लाख रुपयांची लाच मागणारे मीरा भाईंदर महापालिकेचे नगरसेवक अशोक तिवारी आणि प्रभाग अधिकारी सुनील यादव यांना लाच लुचपत प्रतिबंधात्मक विभागाने मंगळवारी सापळा लावून रंगेहाथ अटक केली. फिर्यादीकडून बांधकामाला संरक्षण मिळावे म्हणून त्यांनी ही लाच मागितली होती.
फिर्यादीने केलेल्या बांधकामाविरोधात यादव यांनी नोटीस पाठवली होती. त्याला परवानगी मिळावी म्हणून पत्रकार शशी शर्मा, अशोक तिवारी यांना देण्यासाठी एकूण ४ लाख ८० हजार रुपये देण्याची मागणी यादव यांनी केली होती. दरम्यान, त्यांनी फिर्यादी आणि ठेकेदाराविरोधात एमआरटीपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार त्यांना ४ डिसेंबर रोजी अटक करून सुटका झाली होती. त्यानंतर पुन्हा यादव यांनी फिर्यादीला दूरध्वनी करून सदरच्या बांधकामावर कारवाई होऊ नये, यासाठी ३ लाख २० हजारांची मागणी केली होती.
 पत्रकार शर्मा, नगरसेवक तिवारी यांना देण्यासाठी ही रक्कम मागण्यात आली होती. तडजोडीनंतर रक्कम दीड लाखांवर ठरली. फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानुसार मंगळवारी प्रभाग समिती १ च्या कार्यालयात सापळा लावून नगरसेवक तिवारी यांना १ लाख रुपये आणि प्रभाग अधिकारी यादव याला ५० हजार रुपये घेतानाच अटक करण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.