scorecardresearch

थॅलेसेमिया केंद्रांना रक्तपेढय़ांशी जोडण्याचा परिषदेचा निर्णय

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशामध्ये हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर सुरू देखील करण्याच्या सूचना परिषदेने दिल्या आहेत.

मुंबई: थॅलेसेमियाच्या बालकांना मोफत रक्त देणे बंधनकारक असूनही अनेक रक्तपेढय़ा रक्त देण्यास नाकार देत आहेत. या बालकांना वेळेत आणि मोफत रक्त उपलब्ध होण्यासाठी थॅलेसेमिया केंद्रांना त्यांच्याजवळील दोन ते तीन रक्तपेढय़ांशी जोडण्याचा निर्णय राज्य रक्तसंक्रमण परिषदेने घेतला आहे. मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशामध्ये हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर सुरू देखील करण्याच्या सूचना परिषदेने दिल्या आहेत.

मुंबई महानगर प्रदेशामध्ये सुमारे २ हजार २०० थॅलेसेमियाग्रस्त रुग्ण आहेत. या रुग्णांसाठी वर्षांला सुमारे ६६ हजार युनिट रक्ताची आवश्यकता असून यातील बहुतांश रुग्ण हे आर्थिकदृष्टय़ा दुर्बल कुटुंबातील असल्यामुळे त्यांना दर महिन्याला रक्त खरेदी करणे परवडत नाही. थॅलेसेमिया, सिकल सेल इत्यादी रक्ताशी निगडित आजार असलेल्या रुग्णांना मोफत रक्त देणे केंद्रीय रक्त संक्रमण परिषदेच्या आदेशानुसार बंधनकारक आहे. परंतु मुंबई महानगर प्रदेशात काही रक्तपेढय़ा संकलित केलेल्या रक्तामधील सुमारे ४० टक्के रक्त हे थॅलेसेमिया रुग्णांना देते, तर काही रक्तपेढय़ा रक्त देण्यासाठी नकार देतात.  त्यामुळे रुग्णांची मात्र परवड होत आहे. केंद्राच्या नियमावलीनुसार सर्व रक्तपेढय़ांनी यामध्ये सहभाग होणे बंधनकारक आहे, जेणेकरून काहीच रक्तपेढय़ांवर याचा ताण येणार नाही. परंतु प्रत्यक्षात याचे पालन होत नाही.

थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना मोफत आणि वेळेत रक्त उपलब्ध होण्यासाठी या क्षेत्रात कार्यरत सामाजिक संस्थांच्या माध्यमातून स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय राज्य रक्त संक्रमण परिषदेने जुलै २०२१ मध्ये घेतला आहे. त्यानुसार मुंबई महानगर प्रदेशामध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्याच्या सूचना  दिल्या आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Council decides to link thalassemia centers to blood banks akp

ताज्या बातम्या