scorecardresearch

हेल्मेट न वापरणाऱ्या चालकांचे समुपदेशन; दोन समजपत्र भरावे लागणार

हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांकडून दंड आकारण्याबरोबर त्यांच्याकडून समजपत्र भरून घेण्यात येणार आहे. तसेच त्यांना वाहतूक विभागात बोलावून चलचित्राद्वारे त्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.

मुंबई: हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांकडून दंड आकारण्याबरोबर त्यांच्याकडून समजपत्र भरून घेण्यात येणार आहे. तसेच त्यांना वाहतूक विभागात बोलावून चलचित्राद्वारे त्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश मंगळवारी वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त राजवर्धन सिन्हा यांनी दिले आहेत.
हेल्मेट न घालता दुचाकी चालवणे हा गुन्हा आहे. अशा वाहनचालकांकडून दंड आकारण्यात येतो. मात्र आता त्याबरोबरच समजपत्र भरणे आणि समुपदेशनही सुरू करण्यात येणार आहे. दोन प्रकारचे समजपत्र भरावे लागणार आहेत. पहिले समजपत्र ‘अ’ त्यांना पकडल्यावर तात्काळ भरावे लागेल. त्यात दुचाकीस्वाराचा परवाना क्रमांक, गाडी क्रमांक, नाव अशा माहितीसह समुपदेशनासाठी कधी उपस्थित रहावे, याची लेखी माहिती या समजपत्रात देण्यात येणार आहे. त्यानंतर दुचाकीस्वाराला वाहतूक विभाग कार्यालयात बोलावून त्याचे समुपदेशन झाल्यानंतर त्याच्याकडून समजपत्र ‘ब’ देऊन त्यावर स्वाक्षरी घेण्यात येणार आहे. त्या समजपत्रात विना हेल्मेट दुचाकी चालवल्यामुळे आपल्या व इतरांच्या जीवाला धोका असून त्याची सर्व माहिती समुपदेशनात देण्यात आली आहे. तरी भविष्यात आपल्याकडून असा प्रकार पुन्हा होणार नाही, याची हमी त्या दुचाकीस्वाराकडून घेण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतूक नियोजनासाठी तैनात पोलीस अंमलदारांना समजपत्र ‘अ’ देण्यात येणार आहे. विना हेल्मेट दुचाकीस्वारांच्या समुपदेशनासाठी चित्रफीत तयार करण्यात आली आहेत. ती समुपदेशनादरम्यान चालकांना दाखवण्यात येणार आहेत.
सौजन्याने वागा.. दुचाकीस्वारांशी सौजन्याने वागावे व त्यांची मागील देणी भरण्याबाबत त्यांना सांगण्यात यावे, असेही आदेश वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत. विनाहेल्मेट दुचाकीस्वारांसाठी आता वेगळी नोंदवही तयार करण्यात येणार आहे. त्यात दुचाकी चालक व मालकाचा पत्ता नोंदवण्यात येणार आहे. अधिक वेळा पकडले गेल्यास चालकाचे वाहन चालवण्याचा परवाना निलंबन करण्याकरिता विभागीय परिवहन कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. या सर्व कारवाईवर स्थानिक सहाय्यक पोलीस आयुक्त देखरेख करणार आहेत.
एका महिन्यात ७५ हजार कारवाया
गेल्या महिन्याभरात वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न वापरणाऱ्या चालकांवरील कारवाईत वाढ केली आहे. महिन्याभरात मुंबईत विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या ७५ हजार चालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती उपायुक्त (मुख्यालय, वाहतूक) राजतिलक रौशन यांनी दिली. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यातील बहुतांशी चालकांचे परवाने निलंबित करण्यासाठी अर्ज करण्यात येणार आहे. दंड, परवाना निलंबनाची शिफारस व समुपदेशन अशी तिहेरी कारवाई विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Counseling drivers do not wear helmets two understandings filled traffic police amy

ताज्या बातम्या