जातपंचायतीविरोधात सरकारने कठोर कायदा केला असला तरी या जातपंचायतींनी समाजाला घातलेला विळखा कायम आहे. जातपंचांनी वाळीत टाकल्याने कुडाळ तालुक्यातील एका दाम्पत्याने गणेशमुर्तीसह मंत्रालयाबाहेरच ठाण मांडले आहे. मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्र्यांकडे तक्रार करुनही दोषींवर कारवाई झाली नसल्याच्या निषेधार्थ या दाम्पत्याने मंत्रालयाबाहेर ठाण मांडले आहे.

कुडाळ तालुक्यातील महादेवाचे केरवडे या गावात परमानंद आणि प्रीतम हेवाळेकर हे दाम्पत्य राहतात. या दाम्पत्याने  गावातील रुढी परंपरांना विरोध दर्शवला होता. यानंतर जातपंचांनी हेवाळेकर कुटुंबाला बहिष्कृत केले. २००६ पासून हेवाळकेर कुटुंबीयांना ग्रामस्थांनी वाळीत टाकले आहे.  सरपंच पंढरीनाथ परब यांच्याविरोधात गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे हेवाळेकर दाम्पत्याने तक्रार केली होती. मात्र त्यानंतरी सरपंचावर कारवाई झालीच नाही. शेवटी या दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनीही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. पण अजूनही पंढरीनाथ परब यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

गेल्या तीन वर्षांपासून हेवाळेकर दाम्पत्याला गावात प्रवेश नाकारण्यात येत आहे. यंदादेखील गणेशोत्सव साजरा करण्यासाठी हेवाळेकर गावात दाखल झाले. मात्र ग्रामस्थांनी त्यांना गावात प्रवेश करु दिला नाही.  सरकारकडून मिळणा-या अनुदानाचे पैसे गावात वाटावे लागतात. याला विरोध केल्याने आमच्या शेतीची नासधूस करण्यात आली आणि आम्हाला वाळीत टाकण्यात आले असा आरोप परमानंद हेवाळेकर यांनी केला आहे. याप्रकरणी आता मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी मागणी करत या दाम्पत्याने थेट मंत्रालय गाठले. सध्या हे दाम्पत्य गणेश मुर्तीसह मंत्रालयाबाहेरच ठाण मांडून आहे.