अत्यंत दुर्मिळ प्रकरणात वडिलांची हत्या करणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थ्याला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. संबंधित तरुण हा वरळीचा रहिवासी असून त्याला चार महिन्यांपूर्वी वडिलांची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. न्यायालयाने तरुणाला जामीन देताना त्याच्या वडिलांच्या गैरवर्तवणुकीची दखल घेतली. अपराधी वृत्ती असणारे तरुणाचे वडिल सतत त्याची आई आणि सहा वर्षाच्या बहिणीला मारहाण करत असत. त्याच्या वडिलांना मेहुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी सात वर्षांची शिक्षाही झाली होती

न्यायालयाने तरुणाला दिलासा देताना सांगितलं की, ‘गुन्हा अत्यंत गंभीर असला तरी, तरुणाची कोणातीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. वाईट परिस्थिती या गुन्ह्याला कारणीभूत ठरली असल्याचं समोर येत आहे’. तरुणाला जामीन देताना न्यायालायने या केसच्या ट्रायलसाठी लागणारा वेळ, तरुणाचं वय आणि त्याचं भविष्य या गोष्टीदेखील लक्षात घेतल्या आहेत.

न्यायालयाने ३० हजारांच्या बॉण्डवर तरुणाची सुटका केली आहे. यावेळी तरुणाला जोपर्यंत ट्रायल संपत नाही तोपर्यंत दर महिन्याच्या शेवटी वरळी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचा आदेश देण्यात आला आहे.

१९ फेब्रुवारी रोजी ही हत्या झाली होती. तरुणाच्या वकिलाने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीला हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिक्षा झाली होती. सोबतच त्याच्याविरोधात अनेक गुन्हेदेखील दाखल होते. तरुणाच्या आईने त्याच्या समर्थनार्थ दिलेला जबाबही न्यायालयात सादर करण्यात आला होता. हत्या ही त्या क्षणाची प्रतिक्रिया होती असं वकिलाने सांगितलं होतं. याशिवाय चार्जशीटमध्ये कुठेही ही थंड डोक्याने हत्या केल्याचं नमूद नसल्याचंही सांगण्यात आलं. आरोपी सध्या शिक्षण घेत असून त्याचा हत्या करण्याचा कोणताही प्लान नव्हता असाही युक्तिवाद करण्यात आला होता.