कंगनाविरोधात अटक वॉरंट बजावण्याचा न्यायालयाचा इशारा

कंगनाचा चाचणी अहवाल सकारात्मक आल्यास सुनावणीसाठी गैरहजर राहण्याची मुभा पुन्हा एकदा मागितली जाईल.

मुंबई : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या फौजदारी तक्रारीशी संबंधित प्रकरणाच्या पुढील सुनावणीला गैरहजर राहिल्यास अटक वॉरंट बजावण्यात येईल, असा इशारा अंधेरी न्यायालयाने मंगळवारी अभिनेत्री कंगना राणावतला दिला.

याप्रकरणी मंगळवारी सुनावणी झाली असता कंगना गेल्या दोन आठवड्यांपासून चित्रीकरणात व्यग्र होती. शिवाय तिला करोनाची लक्षणे आहेत. करोनाची चाचणी करता यावी यासाठी तिला मंगळवारच्या सुनावणीला गैरहजर राहण्याची मुभा देण्याची विनंती कंगनाच्या वतीने न्यायालयाला करण्यात आली. कंगनाचा चाचणी अहवाल सकारात्मक आल्यास सुनावणीसाठी गैरहजर राहण्याची मुभा पुन्हा एकदा मागितली जाईल. त्यावेळी तिचा वैद्यकीय अहवालही सादर केला जाईल, असा दावाही कंगनाच्या वतीने करण्यात आला.

परंतु कंगनाच्या मागणीला अख्तर यांच्यातर्फे विरोध करण्यात आला. तसेच आतापर्यंत कंगना एकाही सुनावणीला हजर झालेली नाही. या उलट आपण प्रत्येक सुनावणीला हजर राहात आहोत. त्यामुळे  सतत गैरहजर राहणाऱ्या कं गनाविरोधात अटक वॉरंट बजावण्याची मागणी अख्तर यांच्या वतीने करण्यात आली. या प्रकरणी सुरू केलेल्या कारवाईला आव्हान देणारी कंगनाची याचिका उच्च न्यायालयानेही रद्द केल्याकडे अख्तर यांच्या वकिलाने न्यायालयाचे लक्ष वेधले. न्यायालयाने कंगनाची मंगळवारच्या सुनावणीला गैरहजर राहण्याची मागणी मान्य केली. त्याच वेळी कंगना पुढील सुनावणीच्या वेळी गैरहजर राहिली तर तिच्याविरोधात अटक वॉरंट बजावण्यात येईल, असा इशाराही न्यायालयाने दिला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Court warns of issuing arrest warrant against kangana akp