scorecardresearch

करोना वर्धक मात्रा उपयुक्त

मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या सहाव्या ‘सेरो सव्‍‌र्हे’च्या दुसऱ्या टप्प्याच्या निष्कर्षांतून स्पष्ट झाले.

covid 19 booster give higher antibody
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

मुंबई : करोना लशीच्या दोन मात्रा घेणाऱ्यांच्या तुलनेत वर्धक मात्रा घेणाऱ्या नागरिकांमध्ये प्रतिपिंडांची संख्या अधिक असल्याचे मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या सहाव्या ‘सेरो सव्‍‌र्हे’च्या दुसऱ्या टप्प्याच्या निष्कर्षांतून स्पष्ट झाले. या ‘सव्‍‌र्हे’मध्ये महानगरपालिकेचे आरोग्य सेवा कर्मचारी, घन कचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी आणि बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये करोनाविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण करणारी प्रतिपिंडांची पातळी आजमावणे आणि करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा प्रतिपिंडांच्या पातळीवर होणारे परिणाम पडताळण्यात आले.

टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बा. य. ल. नायर धर्मादाय रुग्णालयातील जन औषध वैद्यकशास्त्र विभाग आणि सूक्ष्म जीवशास्त्र विभागामार्फत ‘सेरो सव्‍‌र्हे – ६’ च्या पहिल्या टप्प्याचे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये सहभागींपैकी ९९.९ टक्के व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण करणारी प्रतिपिंडे आढळली. ज्या व्यक्तींनी दोन मात्र घेतल्या होत्या, त्यांच्या तुलनेत वर्धक मात्रा घेतलेल्या व्यक्तींमध्ये प्रतिपिंडे अधिक आढळली होती. त्यानंतर सहा महिन्यांनंतर ‘सेरो सव्‍‌र्हे’च्या दुसऱ्या टप्प्याचे सर्वेक्षण करण्यात आले. यात पहिल्या टप्प्यामध्ये सहभागी सर्व व्यक्तींची पातळी पुन्हा मोजण्यात आली. या दुसऱ्या टप्प्याचे निष्कर्ष नुकतेच हाती आले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये ३,०९९ व्यक्ती सहभागी होत्या. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये यापैकी २,७३३ (८८ टक्के) सहभागी व्यक्तींचा पाठपुरवठा शक्य झाला. करोनाकाळात आघाडीवर राहून काम करणारे ५० टक्के कर्मचारी आणि ५० टक्के आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश होता. या सर्वेक्षणात सहभागी २,७३३ व्यक्तींपैकी ५९ टक्के व्यक्ती हे २५ ते ४५ वर्ष वयोगटातील होते, तर ४१ टक्के व्यक्ती हे ४५ ते ६५ वर्ष वयोगटातील होते. तसेच यात ५७ टक्के पुरुष आणि ४३ टक्के महिलांचा समावेश होता. तर यापैकी १.३ टक्के व्यक्तींनी करोना प्रतिबंधात्मक लशीची एकच मात्रा घेतली होती.

५५ टक्के व्यक्तींनी दोन मात्रा घेतल्या होत्या आणि ४३ टक्के व्यक्तींनी लशीची वर्धक मात्राही घेतली होती. तसेच केवळ ०.७ टक्के सहभागी व्यक्तींनी करोना लशीची एकही मात्रा घेतली नव्हती. या सर्वेक्षणात फक्त एक व्यक्ती सोडून सर्व जण सेरो सकारात्मक आढळले. याचाच अर्थ सेरो सकारात्मक दर हा ९९.९ टक्के आढळला. ४५ वर्षांहून अधिक वयोगटातील व्यक्तींची सरासरी प्रतिपिंड संख्या ही इतर वयोगटातील व्यक्तींपेक्षा अधिक होती. ज्यांनी करोना लशीची वर्धक मात्रा घेतली होती, अशा व्यक्तींमध्ये दोन मात्रा घेतलेल्या लोकांपेक्षा अधिक प्रतिपिंडे आढळून आली.

वर्धक मात्रा घेण्याचे महानगरपालिकेचे आवाहन..

पहिल्या टप्प्याच्या तुलनेत सर्व सहभागी झालेल्यांपैकी ५७ टक्के व्यक्तींच्या प्रतिपिंड संख्येमध्ये घट दिसून आली. मात्र, असे असले तरीही ६ महिन्यांनंतर त्यांच्या शरीरात प्रतिपिंडांच्या पातळीत लक्षणीय वाढ होती. ‘सेरो सव्‍‌र्हे’चा निष्कर्ष हा वर्धक मात्रेची उपयुक्तता सिद्ध करतो. त्यामुळे  वर्धक मात्रा घ्यावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 03:28 IST