राज्यात एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना वर्धक मात्रेच्या लसीकरणावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्षात ६० वर्षांखालील नागरिकांसाठी वर्धक मात्रेचे लसीकरण सशुल्क आणि खासगी रुग्णालयांपुरतेच मर्यादित असल्यामुळे राज्यात गडचिरोली, गोंदिया, परभणीसह दहा जिल्हयांमध्ये या वयोगटात वर्धक मात्रेचे शून्य लसीकरण झाले आहे.

राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येने तीन हजारांचा टप्पा पार केला आहे. परिणामी, उपचाराधीन रुग्णांची संख्याही आता २३ हजार ७४ वर गेली आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यासह ग्रामीण भागांमध्येही करोनाचा प्रसार होऊ लागला आहे. त्यामुळे लसीकरणावर भर देण्याच्या सूचना आरोग्य विभागाने जिल्ह्यांना दिल्या आहेत. सरकारी लसीकरण केंद्रावर ६० वर्षांवरील नागरिकांना वर्धक मात्रा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र १८ ते ५९ वयोगटातील व्यक्तींसाठी खासगी रुग्णालयांमध्येच वर्धक मात्रा सशुल्क उपलब्ध आहे.

राज्यभरात ६० वर्षांखालील पाच लाख २६ हजार २८८ जणांनी वर्धक मात्रा घेतली –

मुंबई, ठाणे आणि पुणे यांसारख्या शहरांतील खासगी रुग्णालयांमध्ये करोना प्रतिबंधात्मक लसीकरण उपलब्ध आहे. त्यामुळे या भागांमध्ये वर्धक मात्रेचे लसीकरणही तुलनेने जास्त झाले आहे. राज्यभरात ६० वर्षांखालील पाच लाख २६ हजार २८८ जणांनी वर्धक मात्रा घेतली आहे. यामध्ये सुमारे ८७ टक्के लसीकरण हे मुंबई, पुणे आणि ठाण्यात झाले आहे. राज्यात या वयोगटातील सर्वाधिक वर्धक मात्रेचे लसीकरण मुंबईत झाले आहे. मुंबईत ६० वर्षांखालील सुमारे २ लाख ३२ हजार जणांनी वर्धक मात्रा घेतली आहे. त्या खालोखाल पुणे, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश आहे.

दहा जिल्हयांमध्ये खासगी रुग्णालयांमध्ये सशुल्क वर्धक मात्रा उपलब्ध नाही –

ग्रामीण किंवा अन्य दुर्गम जिल्ह्यांमध्ये मात्र खासगी लसीकरण फारसे सुरूच झाले नसल्याने वर्धक मात्रेचे लसीकरण कमी प्रमाणात झाले आहे. जवळपास दहा जिल्हयांमध्ये खासगी रुग्णालयांमध्ये सशुल्क वर्धक मात्रा उपलब्ध नसल्याने लसीकरण सुरू झालेले नाही. राज्यभरात दोन्ही मात्रांचे लसीकरण ८५ टक्क्यांहून जास्त झालेल्या भंडाऱा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वर्धक मात्रेचे लसीकरण शून्य झाले आहे. यासोबत शून्य लसीकरण झालेल्या जिल्ह्यांमध्ये गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, नांदेड, परभणी, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे.

४० ते ६० वयोगटातील नागरिकही जोखमीच्या गटात –

काही जिल्ह्यांमध्ये हे लसीकरण काही विभागांपुरतेच मर्यादित असल्यामुळेही लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळाला आहे. धुळे, लातूर येथे प्रत्येकी तीन आणि उस्मानाबाद येथे दोनजणांना वर्धक मात्रा मिळाली आहे. करोनाचा धोका हा ६० वर्षावरील नागरिकांना असला तरी ४० ते ६० वयोगटातील नागरिकही जोखमीच्या गटात आहेत. यात विशेषत: मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग इत्यादी दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांना याचा धोका जास्त आहे. दुसऱ्या मात्रेचा परिणाम हा काही महिन्यांपुरताच असल्याचे आत्तापर्यतच्या अनेक संशोधनात्मक अभ्यासातून निदर्शनास आले आहे. त्यामुळे ६० वर्षांखालील या जोखमीच्या गटासाठीही वर्धक मात्रा सर्व जिल्ह्यांमध्ये उपलब्ध होणे गरजेचे आहे, असे मत करोना कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी व्यक्त केले.