मुंबई : मुंबईत नव्याने सापडणाऱ्या करोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईत गुरुवारी २ हजार ४७९ करोना रुग्ण सापडले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. २१ जूनला १ हजार ७८१ आणि २२ जूनला १ हजार ६४८ रुग्ण सापडले होते. गुरुवारी नव्याने सापडलेल्या रुग्णांची संख्या दोन हजारच्या पुढे गेली.

सापडलेल्या नवीन रुग्णांपैकी २ हजार ३७० रुग्णांना लक्षणे नाहीत. तर १०९ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर नवीन रुग्णांपैकी २४ जणांना प्राणवायूची सुविधा उपलब्ध करावी लागली. गुरुवारी २ हजार ३६५ रुग्ण बरे झाले आहेत. वाढ होणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता पालिकेने चाचण्याही वाढवल्या आहेत. गुरुवारी २० हजार ४०८ चाचण्या करण्यात आल्या. मुंबईत रुग्णदुप्पटीचा दर ३९० दिवसांवर पोहोचला आहे. सध्या मुंबईतील एकही झोपडपट्टी, चाळ आणि इमारत टाळेबंद नसल्याचे मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आले. सध्या १३ हजार ६१४ उपचाराधीन रुग्ण आहेत.

राज्यात दैनंदिन रुग्णसंख्या पाच हजारांहून जास्त

मुंबई : मागील तीन दिवस सुमारे चार हजारांच्याही खाली असलेल्या दैनंदिन रुग्णसंख्येने गुरुवारी पाच हजारांचा टप्पा पार केला. गुरुवारी राज्यभरात ५ हजार २१८ रुग्ण नव्याने आढळले आहेत, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. एकीकडे राज्यातील रुग्णसंख्या वेगाने वाढत असली तरी दुसरीकडे करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही त्याच वेगाने वाढत आहे. गुरुवारी राज्यभरात ४ हजार ९८९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मागील तीन दिवस चाचण्या कमी होत असल्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्येतही घट झाल्याचे आढळले होते. परंतु बुधवारी चाचण्यांमध्ये वाढ होताच रुग्णसंख्येतही जवळपास एक हजाराने वाढ झाली आहे.